बीड : मौजमजा करण्यासाठी गुन्हेगारी वर्तुळात उतरलेल्या व अल्पावधीत दुचाकीचोरीत ‘एक्सपर्ट’ बनलेल्या पदवीधर तरुणाचा पर्दाफाश करण्यात येथील दरोडा प्रतिबंधक पथकाला नुकतेच यश आले. त्याने केलेल्या गुन्ह्याच्या सुरस कथा ऐकून पोलीसही चक्रावून गेले आहेत. त्याच्याकडून तब्बल १९ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असून त्याने बहुतांश गुन्हे औरंगाबादेत करुन दुचाकींची बीड जिल्ह्यात विक्री केल्याचे समोर आले आहे.कुंडलिक बन्सी राठोड (रा. औरंगपूर तांडा, निपाणी जवळका ता. गेवराई) असे त्या आरोपीचे नाव आहे. सत्ताविशीतील कुंडलिकचे कुटुंब अल्पभूधारक असून त्यावरच त्यांची गुजराण आहे. गेवराईत कला शाखेची पदवी संपादन केल्यानंतर कुंडलिकचे लग्न झाले. त्याची सासुरवाडी गेवराई तालुक्यातच असून त्याला दोन मुले आहेत. लग्नानंतर त्याने कामधंदा केला नाही. दरम्यानच्या काळात त्याला मित्रांच्या संगतीने मौजमजा करण्याची सवय जडली. मात्र, पैशाची चणचण भासू लागल्याने त्याने गुन्हेगारीचा मार्ग पत्करला. मागील दोन वर्षांपासून तो दुचाकीचोरीचे गुन्हे करत होता. पकडलेल्या दुचाकी मिळतील तेवढ्या पैशांत विक्री करुन तो या पैशांवर मौजमजा करत असे. औरंगाबाद येथे वाहनांची मोठी संख्या आहे. रस्त्याच्या दुतर्फा, बसस्थानक, रेल्वेस्थानक व दवाखान्यांसमोर दुचाकी वाहनांची मोठी गर्दी असते. अशी वाहने हेरुन तो हँडललॉक तोडत गुन्हे करायचा. दुचाकी चोरीत तो एवढा निष्णात झाला होता की, अवघ्या पाच मिनिटांत दुचाकी घेऊन धूम ठोकायचा. त्याच्यासोबत आणखी काही साथीदार असावेत, असा पोलिसांना संशय आहे. (प्रतिनिधी)
चोरीच्या दुचाकीवर करायचा मौजमजा
By admin | Updated: December 24, 2016 00:58 IST