औरंगाबाद : राज्यातील भाजपा सरकार अल्पमतातले असून, ते असंवैधानिक असल्याचा आक्षेप आज येथे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी घेतला. दुष्काळ परिषद संपल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी सांगितले की, १२२ च्या वर या सरकारला कोणत्या व किती आमदारांचा पाठिंबा आहे, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा या सरकारने विश्वास प्रस्ताव संमत करून घेतला पाहिजे. कोणतेही सरकार घटनेची पायमल्ली करणारे नसावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेनुसार चालावे, ही अपेक्षा आहे. हे अल्प मतातले सरकार चालता कामा नये. यासाठी आम्ही राज्यपाल, राष्ट्रपती आणि उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. मुख्यमंत्री बहुजन असायला हवा होता, या एकनाथ खडसे यांच्या मताशी आपण सहमत आहात का, असे विचारले असता ठाकरे उत्तरले की, शेवटी मुख्यमंत्री कुणाला करावयाचे हा भाजपाचा अंतर्गत प्रश्न होता; परंतु भाजपावर आरएसएसचा रिमोट कंट्रोल चालतो, हे काही लपून राहिलेले नाही. ज्याने जास्त दिवस चड्डी घातली त्याला त्यांनी मुख्यमंत्री बनविले. एकनाथ खडसे यांनी कदाचित फडणवीस यांच्यापेक्षा कमी दिवस चड्डी घातलेली असावी. एका प्रश्नाच्या उत्तरात ठाकरे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतीत गेलेले नाहीत. त्यांना शेतीतले ते काय कळणार? म्हणूनच ते पाण्याचा दुष्काळ नाही, असे म्हणू शकतात.सरकारच असे म्हणू लागल्यानंतर लोकांनी पाहावे तरी कुणाकडे? आणि साडेचार हजार कोटी रुपये हे कितीतरी कमी ठरणार आहेत. त्यासाठीही केवळ केंद्राकडे बोट दाखविण्याचे काम सुरू आहे. कोरडवाहू शेतकऱ्यास २५ हजार रुपये व फळबागांसाठी ५० हजार रुपये याप्रमाणे आर्थिक पॅकेज देण्याची मागणी ठाकरे यांनी यावेळी केली.
राज्य सरकार अल्पमतातलेच
By admin | Updated: December 1, 2014 01:27 IST