जालना : शहरातील मोती तलावातील गाळ काढण्यास पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते बुधवारी सकाळी प्रारंभ झाला.याप्रसंगी आ. अर्जुनराव खोतकर, जि.प. अध्यक्ष तुकाराम जाधव, उपाध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे, उपनगराध्यक्ष शाह आलमखान, उपविभागीय अधिकारी मंजूषा मुथा, मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे, तहसीलदार रेवननाथ लबडे, विलास नाईक, जगदीश नागरे आदी उपस्थित होते.यावेळी पालकमंत्री लोणीकर म्हणाले की, मराठवाड्यात दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने शासनाने जलयुक्त शिवार अभियान राबविण्याचे काम हाती घेतले आहे. गाळ काढण्याचा उपक्रम लोकचळवळ झाली पाहिजे. जवळपासच्या १०० गावांतील शेतकऱ्यांनी या ठिकाणचा गाळ नेण्यासाठी आपली वाहने आणावित. गाळ काढण्यासाठी शासनाने जेसीबी मशिनरी दिल्या आहेत. या मशीनरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी गाळ आपल्या शेतातील गाळ टाकण्यासाठी घेऊन जाव्यात. गाळ काढण्यासाठी मशिनरींची संख्या कमी पडल्यास मशिनरींची संख्या वाढविली जाईल, असेही लोणीकर यांनी सांगितले. बुधवारी मोती तलावासह बदनापूर तालुक्यातील सोमठाणा, अंबड तालुक्यातील दावरगाव, मंठा तालुक्यातील अंभोरा जहांगीर, तळणी येथे गाळ काढण्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आ. नारायण कुचे, माजी आमदार विलास खरात, अरविंद चव्हाण आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मोती तलावातील गाळ काढण्यास प्रारंभ
By admin | Updated: February 19, 2015 00:43 IST