लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बिंदुसरा नदीवरील नवीन पुलाचे काम तात्काळ सुरू करून वाहनधारक व नागरिकांच्यावतीने शनिवारी बार्शी नाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामध्ये विविध स्तरातील नागरिकांनी सहभाग नोंदवून प्रशासनाबद्दल आपला संताप व्यक्त केला. जुन्या पुलावरून रूग्णवाहिकेसह दुचाकी व तीन चाकी वाहनाला परवानगी देण्याची मागणीही त्यांनी केली.मागील अनेक वर्षांपासून बिंदुसरा नदीवरील पुलाचा प्रश्न प्रलंबित आहे. शहरातून जाणाºया सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावर हा पूल असल्याने अवजड वाहनांची वाहतूक असते. परंतु जुना पूल धोकादायक झाल्याने वर्षापूर्वीच बंद केला. त्यानंतर बाजूने पर्यायी पूल तयार करण्यात आला. हा पूलही गत महिन्यात झालेल्या पावसामुळे वाहून गेला. दोन्ही पूल बंद झाल्यामुळे अवजड वाहनांसह छोटी-मोठ्या वाहनांची वाहतूक शहरातून वळविण्यात आली. शहरातील रस्ते आगोदरच अतिक्रमणे व इतर कारणांनी अरूंद आहेत. त्यातच मोठी वाहने शहरातून वळविल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. याचा त्रास सर्वसामान्य वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. तसेच अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. याला सर्वसामान्य जनता वैतागली आहे.हाच मुद्दा पकडून संतापलेल्या बीडकरांनी शनिवारी बार्शी नाका येथे रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनात लक्ष्मण विटकर, संजय उडाण, शैलेष जाधव, सुनील सुरवसे, सुनील महाकुंडे, खुर्शीद आलम, शेख आमेर, मुफ्ती वाजेद, भाऊसाहेब गलधर, भीमा निंबाळकर, आदिनाथ भांडवले, भैय्या मोरे, अशोक कदम, संजय लकडे, महेश सिंघन, गणेश गरूड, पप्पू ढोले, शदर धोंगडे, रोहित जाधव, मोमीन मसी, राजू कुसळकर, सुनील महाकरे यांच्यासह शहरातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते.
‘नवीन पुलाचे काम तात्काळ सुरू करा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:43 IST