जालना : राज्यशासनाने स्वस्त धान्य दुकानांमार्फत होणारा काळा बाजार रोखण्यासाठी बायोमेट्रिक पद्धतीने धान्य वितरण करण्याचा क्रांतीकारी निर्णय घेतलेला आहे. जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर त्याचा शुंभारंभ करण्यात आला असून, यासाठी लाभार्थ्यांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी केले आहे.स्वस्तधान्य वितरण प्रणाली पारदर्शक करण्यासाठी बायोमेट्रीक पद्धतीने धान्य वितरणाचा शुभारंभ शहरातील शास्त्रीमोहल्ला येथील दुकान नं ३२ मधून जिल्हाधिकारी जोंधळे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी केशव नेटके, जिल्हा पुरवठा अधिकारी राजीव नंदकर, तहसीलदार विपीन पाटील, नायब तहसीलदार एन. वाय. दांडगे आदींची उपस्थिती होती.जिल्हाधिकारी जोंधळे म्हणाले की, राज्यशासनाने गोरगरीबांच्या कल्याणासाठी कल्याणकारी व क्रांतीकारक असा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार स्वस्त धान्य दुकानातून वितरित होणारे धान्य हे ई- ‘पॉस’ मशिनच्या सहाय्याने वितरित करण्यात येणार आहे. यासाठी कुटुबांतील व्यक्तीचा आधारकार्ड नंबर व बोटाचे ठसे घेण्यात येत आहेत. यात किती धान्य व किती रूपये झाले याची पावती ताबडतोब मिळते. त्या पावतीनुसार पैसे देऊन किंवा कार्ड स्क्रॅच करून धान्य घेता येईल. यामुळे धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी कमी होण्यासोबतच धान्याचा काळाबाजार रोखण्यासही मदत होणार आहे. सध्या जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर दोन ठिकाणी या योजनेचा शुभारंभ झाला असून, २८ फेबु्रवारी पर्यंत जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानदारांना या मशिन उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यासाठी सर्व दुकानदारांसह नागरिकांनी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. (प्रतिनिधी)
कॅशलेस प्रणालीद्वारे धान्य वितरणास प्रारंभ
By admin | Updated: January 14, 2017 00:30 IST