लातूर : लातूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सात सदस्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे रिक्त जागेसाठी सोमवारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. महापौर स्मिता खानापुरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत स्थायीच्या ८ व विविध विषयांच्या ५ समित्यांचे गठण करण्यात आले आहे. शिवाय, झोननिहाय ४ प्रभाग समित्यांची निवडही करण्यात आली. एका समितीत ९ मतदारसंघांचा समावेश असून, समितीत १८ सदस्यांचा समावेश आहे. ५ लाखांपर्यंत कामाला मान्यता देण्याचे अधिकार या प्रभाग समितीला आहेत. त्यामुळे प्रभागातील नागरिकांचे किरकोळ प्रश्न प्रभाग समितीच्या माध्यमातूनच मार्गी लागणार आहेत. सोमवारी झालेल्या विशेष सभेत प्रभाग समित्याही महापौरांनी जाहीर केल्या. उपमहापौर सुरेश पवार, आयुक्त सुधाकर तेलंग यांची प्रमुख उपस्थिती होती. सभेत प्रारंभी सभागृह नेत्यांची निवड करण्यात आली. काँग्रेसचे बहुमत असलेल्या मनपात नरेंद्र अग्रवाल यांची दुसर्यांदा सभागृह नेतेपदी निवड करण्यात आली आहे. तसेच रिपाइंच्या गटनेतेपदी दुसर्यांदा चंद्रकांत चिकटे यांची निवड झाल्याचे महापौरांनी घोषित केले. काँग्रेसचे गटनेते नरेंद्र अग्रवाल, अॅड. समद पटेल यांनी काँग्रेसच्या स्थायी समिती सदस्यांची नावे महापौरांकडे दिली. राष्ट्रवादीकडून मकरंद सावे तर शिवसेनेच्या गटनेत्या सुनीता चाळक यांनी स्थायीच्या सदस्यांची नावे महापौरांकडे सुपूर्द केली. शिवसेनेचे सदस्य गोरोबा गाडेकर यांनी स्थायी समितीच्या सदस्यत्वाचा मुदत संपण्यापूर्वीच राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या ठिकाणी रवि सुडे यांची वर्णी लागली आहे. (प्रतिनिधी)
स्थायी समितीला मिळाले ८ नवे चेहरे
By admin | Updated: May 20, 2014 01:12 IST