जालना : मातंग समाजाने राजकीय नेत्यांना आम्ही तुमचेच.. असे म्हणणे सोडून द्यावे, किती दिवस अशी भूमिका घेणार याचा विचार करून आपल्या प्रश्नासाठी व्यवस्थेविरूद्ध उभे राहाल, तरच प्रश्न सुटतील, असे परखड मत अॅड. दयानंद भांगे यांनी व्यक्त केले.क्रांतीगुरू लहुजी साळवे विकास परिषदेच्यावतीने रविवारी मा. फुलंब्रीकर नाट्यगृहात आयोजित मांतग समाजाच्या राज्यस्तरीय मेळाव्यात ते बोलत होते.मेळाव्याचे उद्घाटन आ. अर्जुन खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रांतीगुरू लहुजी साळवे विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उत्तमराव कांबळे हे होते. तर आ. नारायण कुचे, भाजपा जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, डॉ. दिलीप अर्जुने, डॉ. नाडे, राजहंस मोरे, अशोक लोखंडे, गणेश भालेराव, विनोद आठवे, चतुरसिंग गोफणे, राजू खोजेकर, मच्छिंद्र कांबळे आदींची उपस्थिती होती. अॅड. भांगे म्हणाले, मातंग समाजाच्या विकासासाठी तत्कालीन सरकारने समाजाच्या प्रश्नावर अभ्यास करण्यासाठी क्रांतीगुरू लहुजी साळवे अभ्यास आयोग नेमला. या आयोगाने मूळ प्रश्न सोडून दुसऱ्याच प्रश्नाचा अभ्यास केला. आयोगाचे अध्यक्ष हे रमेश कदम होते. ज्यांनी समाजाच्या १०० कोटी रूपयांचा भ्रष्टाचार करून स्वत:चा विकास केला. तेव्हा समाजाचा विकास कसा होणार, असा सवाल करून ते म्हणाले की, राज्य घटनेत ५९ मागास जातीला आरक्षण दिलेले आहेत. त्या आरक्षणाची अंमलबंजावणी व्यवस्थित झाली असती तर नव्याने आरक्षण मागणीची वेळ आली नसती. म्हणून समन्यायी पद्धतीने समान आरक्षण वाटप करून ए.बी.सी अशी वर्गवारी करावी, अशी आमची मागणी आहे.समाजाच्या आरक्षण व अन्य प्रश्नासाठी जो पर्यंत व्यवस्थेविरूद्ध लढा उभारला जाणार नाही. तोपर्यंत समाजाचे प्रश्न सुटणार नाही. तेव्हा समाजातील सर्व संघटनांनी एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी आ. अर्जुन खोतकर म्हणाले की, मातंग समाजाचे जे काही प्रश्न असतील ते हिवाळी अधिवेशनात मांडून सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. समाजाला न्याय देण्याची आपली भूमिका राहणार असून यासाठी समाजाच्या पाठीशी आपली सर्व ताकद उभी करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.कार्यक्रमात शाहीर अविनाश साळवे व त्यांच्या संचाने क्रांतीगुरू लहुजी साळवे, अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आधारीत गीतांतून समाज प्रबोधन केले. कार्यक्रमास जालना जिल्ह्यासह राज्यभरातील समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
समाजासाठी व्यवस्थेविरूद्ध उभे राहा
By admin | Updated: October 25, 2015 23:59 IST