जालना : प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी शुक्रवारी कामगारांनी एसटीच्या विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. गेल्या अनेक वर्षांपासून कामगारांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत. परंतु निधीच नसल्याचे कारण पुढे करून याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने कामगारांच्या प्रश्नांची वेळत सोडवणूक होत नाही. अनेक वर्षांपासून कामगारांचे वेतनात वाढ करावी या मागणीसाठी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी धरणे आंदोलने केलीत. परंतु याकडे कायम दुर्लक्ष करण्यात येत असल्याने कर्मचाऱ्यांत संताप आहे. सणासुदीचे दिवस असल्याने कामगारांच्या कुटुंबियांना दिवाळी चांगल्या प्रकारे साजरी करता यावी यासाठी शासनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.जालना विभागातील कामगारांना गे्रडेशन वेळेत देण्यात यावे, भविष्यनिर्वाह निधीची उचल, वैद्यकीय बिलाची रक्कम देण्यात यावी, राज्य परिवहन कामगारांना ७ वा वेतन आयोग लागू करण्यात यावा, तसेच शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन निश्चिती करावी, कर्मचाऱ्यांची कनिष्ठ वेतनश्रेणी रद्द करावी, नवीन कामगार करार होईपर्यंत २५ टक्के अंतरिम वाढ लागू करावी तसेच ६ टक्के वाढीव महागाई भत्त्याची उर्वरित ७५ टक्के थकबाकी दिवाळीसणापूर्वी देण्यात यावी, कर्मचाऱ्यांना १५ हजार रूपये दिवाळीपूर्वी देण्यात यावे, निलंबित करण्याबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा भंग करून वाहकास अपराध प्रकरणी अंतिम निकाल लागेपर्यंत निलंबन ठेवण्याबाबतचे परिपत्रक रद्द करावे, वास्तवादी धाववेळ देण्यात यावी, विनावाहक गाड्यांबाबत फेरविचार करावा, घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी वेळेत करावी, सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना मोफत पास देण्यात यावा आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. या मागण्या पूर्ण कराण्यासाठी कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय धरणे आंदोलन केले. (प्रतिनिधी)
एस.टी.कामगारांचे धरणे आंदोलन
By admin | Updated: October 15, 2016 00:39 IST