औरंगाबाद : पैठण येथे मंगळवारपासून होणाऱ्या नाथषष्ठी सोहळ्यासाठी जाणाऱ्या हजारो वारकरी, भाविकांना सोमवारी मध्यवर्ती बसस्थानकात भर उन्हात तासन्तास उभे राहून बसगाड्यांची वाट पाहावी लागली. भाविकांच्या सुविधेसाठी जादा बसेस सोडण्याचे नियोजन कागदावरच राहिल्याने भाविकांची प्रचंड गैरसोय झाली. त्यामुळे एस.टी.महामंडळाने पैठणला जाणाऱ्या भाविकांची एक प्रकारे परीक्षाच घेतली.पैठणला जाण्यासाठी वारकरी, भाविकांची सोमवारी सकाळपासूनच मध्यवर्ती बसस्थानकात मोठी गर्दी पाहायला मिळाली. भाविकांच्या सुविधेसाठी एस. टी. महामंडळाने विभागातून १०० जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले; परंतु हे नियोजन केवळ कागदावरच राहिल्याचे सोमवारी दिसून आले. मध्यवर्ती बसस्थानकात तासन््तास पैठणला जाणाऱ्या बसगाड्यांची वाट पाहण्याची वेळ वारकऱ्यांवर आली. एखादी बस येताच त्यामागे पळत जाऊन जागा पकडण्यासाठी धावपळ करण्याची वेळ वारकऱ्यांवर आली. गर्दीने प्लॅटफॉर्मवरील जागा अपुरी पडली. त्यामुळे भर उन्हात सावलीची, आडोशाची शोधाशोध करण्याची वेळ वारकऱ्यांवर आली.
‘एसटी’ने घेतली वारकऱ्यांची परीक्षा
By admin | Updated: March 29, 2016 00:52 IST