महेश पाळणे , लातूरखेळाडू घडविण्याचे मुख्य स्त्रोत म्हणजे प्रशिक्षण शिबीर होय. अशा शिबिरांच्या माध्यमातूनच खेळाडूंच्या कौशल्यात भर पडते. उन्हाळ्याच्या सुटीत तर अशा प्रकारच्या शिबिरांचे आयोजन होत असते. मात्र लातूर शहरात काही मोजक्याच खेळांच्या माध्यमातून हे सराव शिबीर होत होते. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच अनेक खेळांच्या संघटना या सराव शिबिरासाठी पुढे आल्या आहेत. त्यामुळे खेळाडूंना तंत्रशुद्ध असे मार्गदर्शन यातून मिळणार आहे. शालेय स्पर्धेत नव्याने अनेक खेळांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे खेळांची संख्या शंभराच्या वर जाऊन पोहोचली आहे. मैदानी खेळासह इतर खेळांच्या उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे बोटावर मोजण्याइतकेच प्रशिक्षण शिबिरे संघटना व क्रीडा कार्यालयामार्फत शहरात चालू आहेत. मात्र अन्य खेळांचे काय, असा प्रश्न ‘लोकमत’मध्ये नुकताच मांडण्यात आला होता. याची दखल घेत विविध खेळांच्या संघटना पुढे आल्या असून, आता व्हॉलीबॉलसह बास्केटबॉल, सायकल पोलो, नेटबॉल, तलवारबाजी यासह नवीन मान्यता मिळालेल्या खेळांच्याही सराव शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.
उन्हाळी प्रशिक्षण शिबिरासाठी क्रीडा संघटना सरसावल्या
By admin | Updated: May 8, 2015 00:27 IST