औरंगाबाद : मागील एक तपापासून नारेगावकर कचरा डेपो हलविण्यासाठी आंदोलने करीत आहेत. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात कचरा डेपो हलविण्यासाठी मिटमिटा येथील जागा विचारात घेण्यात आली होती. त्या व तीसगावच्या जागेच्या मागणीबाबत व डेपो हलविण्यासाठी आज मंथन बैठक झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र येथे झालेल्या बैठकीला प्रशासनातील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. १०० दिवसांच्या मुदतीत डेपो शिफ्ट होईल, असा दावा मनपाने गेल्यावर्षी केला होता. महापालिकेने नारेगाव येथील कचरा डेपो मिटमिटा येथील गट नं. ३०७ मधील ५० एकर जागेत हलविण्याची तयारी सुरू केली होती. मात्र, मिटमिट्यातील नागरिकांनी त्याला कडाडून विरोध केला होता. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कचरा डेपोवरून राजकारण पेटले होते. त्यामुळे मिटमिट्याऐवजी तीसगाव येथील जागेत डेपो हलविण्यासाठी तयारी सुरू झाली. मात्र, तेथेही जागा मिळू शकलेली नाही. डिसेंबर २०१३ मध्ये मनपा प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी जागेची पाहणी केली होती. ३ महिन्यांत विविध विभागांच्या १३ एनओसी मिळाल्यानंतर तेथे कचरा डेपो करण्याचा मार्ग मोकळा होणार होता. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालय शासनाकडे जागेसाठी पत्रव्यवहार करून मंजुरी मिळविण्याच्या तयारीत असताना मिटमिटा येथील नागरिकांनी आंदोलन उभे केले. मिलिटरीने मिटमिटा गट नं. ३०७ मधील काही जागा मागितली आहे. त्यांना जागा देण्यासाठी निर्णय झालेला आहे. नारेगावसह आसपासचे हजारो नागरिक अनेक वर्षांपासून गाव प्रदूषणमुक्त होण्याची वाट पाहत आहेत.संशोधन केंद्रावर बैठकडॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रावर झालेल्या बैठकीला अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, शहर अभियंता एस.डी. पानझडे, घनकचरा व्यवस्थापक डी.डी. सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती. नारेगावचे नगरसेवक मनीष दहीहंडे यांनी डेपो हलविण्याची मागणी केली असून लवकरात लवकर निर्णय न झाल्यास कचरा संकलनाचे ट्रक नारेगावातून जाऊ न देण्याचा इशारा दिला आहे. आयुक्त म्हणाले...आयुक्त पी.एम. महाजन म्हणाले की, अतिरिक्त आयुक्त पवार यांनी आज बैठक घेतली. शासनाकडे जागा मागितली आहे. मिटमिटा आणि तीसगाव येथील जागेची मागणी केली आहे. अजून त्या जागा पालिकेला मिळालेल्या नाहीत. जागा मिळाली तर डेपो स्थलांतर करण्याचा विचार होऊ शकेल.
कचरा डेपो हलविण्याच्या हालचालींना वेग
By admin | Updated: October 30, 2014 00:30 IST