हिंगोली : निसर्गाचा प्रकोप आणि शासनाने बियाण्यातून हटविलेली सबसिडी यामुळे यंदा सोयाबीन बियाण्यांच्या दामाने प्रचंड उड्डाण घेतली. गतवर्षी सरसकट कंपन्यांच्या सोयाबीनची एक बॅग १ हजार ७०० रूपयांच्या आत खरेदी केलेल्या उत्पादकांना यंदा कितीही पैसा मोजला तरी सोयाबीनचे प्रमाणित बियाणे मिळणे दुर्मिळ झाले. परिणामी महाबीजच्या ३० किलोच्या एका बॅगसाठी २ हजार ३८५ तर इगलसाठी २ हजार ७०० रूपये आजघडीला मोजावे लागत आहेत. सध्याच्या दरात पाऊस पडताच आणखीच वाढ संभवित असल्याने कदाचित अनेक उत्पादकांना कंपन्यांचे बियाणे मिळणार नाही. सोयाबीन काढणीच्यावेळी झालेल्या पावसाने उत्पादकांची माती केली. पिकाच्या नुकसानीबरोबर सोयाबीनला बाधा पोहोचली. पाण्यामुळे स्वपरागसिंचित असलेल्या सोयाबीनच्या उगवणशक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने घरचे सोयाबीन पेरणीला मर्यादा आली. आता त्याचा फटका सर्वच शेतकर्यांना बसताना दिसतो. दरम्यान, शासनाने सोयाबीन बियाणे उत्पादीत करणार्या कंपन्यांना सबसिडी दिली नाही. परिणामी भाववाढ अटळ झाल्याने आज उत्पादकांना सोयाबीनचे बियाणे खरेदी करताना कर्ज काढण्याची पाळी आली. जवळपास सर्वच उत्पादकांनी सोयाबीनचा पेरा अधिक ठेवल्याने त्याच्या क्षेत्रात विक्रमी वाढ झाली. गतवर्षीच्याच क्षेत्राएवढेही सोयाबीनचे बियाणे जिल्ह्यात उपलब्ध नाही. यंदा झालेल्या वाढीचा प्रश्न कोसो मैैल दूर असल्याने उत्पादकांच्या कपाळावर आठ्या उमटू लागल्या. आतापासूनच हिंगोली शहरातील बियाणे विक्रेत्यांकडे शेतकरी सोयाबीनच्या बियाण्यांची विचारणा करू लागले. पैैसे मोजण्याची तयारी असली तरी विक्रेत्यांकडून सोयाबीनच्या बियाण्यांचा तुटवडा सांगण्यात येवू लागला. आजमितीला बाजारात महाबीजच्या ३० किलोच्या एका बॅगसाठी २ हजार ३८५ रूपये मोजावे लागत असल्याचे रिटेल विक्रता रितेष अग्रवाल यांनी सांगितले. महाबीजच्या बियाण्यांची ही कथा असताना इगलच्या दरात विक्रमी वाढ झाली. गतवर्षी १ हजार ७०० रूपयांना असणारी बॅग यंदा २ हजार ७०० रूपयांवर गेली. तब्बल १ हजाराची वाढ झाली असताना या बियाणे अनेक ठिकाणी उपलब्ध नसल्याचे विक्रेते सांगतात. आताच ही गत असताना पेरणीच्या वेळी सोयाबीनचे बियाणे मिळण्यासाठी उत्पादकांना कसरत करावी लागणार आहे. (प्रतिनिधी) उगवणशक्ती तपासून वापरा घरचे बियाणे कपटाच्या खोक्यात माती भरून वापसा होईल एवढे पाणी टाकावे. तद्नंतर या मातीत सोयाबीनचे दाणे मोजून टाकावे. गरजेपुरते पाणी टाकून मातीने झाकावे. आठवड्यानंतर उवगलेले बियाणे मोजावे. त्यानंतर पेरलेले बी आणि उगवलेले बी यांची मोजणी करावी. मोजणीअंती न उगवलेले बियाणे पेरणीच्या वेळी अधिक घ्यावे. याचप्रमाणे पोती भिजून आत मोजून सोयाबीनचे बियाणे टाकावे. त्यानंतर पोती गुंडाळून पाणी टाकावे. काही दिवसांनी पोती उकलून आत उगवलेले बियाणे मोजून उगवणशक्ती तपासता येणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले.
सोयाबीन बियाणे महागले
By admin | Updated: May 14, 2014 01:01 IST