ईट : यंदाच्या पावसाळ्यात तब्बल एक ते दीड महिना विलंबाने पावसाने आगमन झाले. त्यावरच शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली. परंतु, सध्या या पिकावर पाने गुंडाळणारी व पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्याने हे पीक संकटात सापडले असून, यामुळे उत्पादनात मोठी घट येण्याची भीतीही शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.यंदा पावसाळ्यापूर्वी झालेला अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेतकरी संकटात सापडलेला असतानाच पावसाळ्याच्या सुरूवातीलाच पावसाने ओढ दिल्याने चिंता वाढली होती. तब्बल दीड महिन्यानंतर झालेल्या अत्यल्प पावसावरच शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या. या भागात खरीप हंगामातील कापूस पिकाच्या लागवडीचे क्षेत्र कमी होऊन ती जागा नगदी समजल्या जाणाऱ्या सोयाबीनने घेतली. यामुळे सोयाबीनचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले. त्यातच अनेक शेतकऱ्यांचे बियाणे उगवले नसल्याने बळीराजाच्या संकटात भरच पडली. या सर्व संकटातून वाचलेल्या पिकांना गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे चांगला दिलासा मियाला. परंतु, आता या पिकावर पाने गुंडाळणाऱ्या अळीचा तसेच पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे उत्पादन घटण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात आहे. अगोदरच अनेक संकटांचा सामना करणाऱ्या बळीराजासमोर आता पुन्हा नवीन संकट उभे राहिले असून, कृषी विभागाचे मात्र याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचा आरोप बळीराजाकडून केला जात आहे. (वार्ताहर)
सोयाबीनवर अळीचा प्रादुर्भाव
By admin | Updated: August 26, 2014 00:22 IST