औरंगाबाद : पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी शुक्रवारी शहर पोलीस आयुक्तालयातील अनेक ठाणेदारांच्या बदल्यांचे आदेश काढले. या बदल्यामंध्ये अनेकांना अपेक्षित ठाणे मिळाले नाही. मात्र, काहींनी गल्ली ते मुंबईपर्यंत लॉबिंग करून ‘क्रीम’ पोलीस ठाणे पदरात पाडून घेतल्याची चर्चा सुरु आहे. बदल्यांमुळे ठाणेदारांमध्ये ‘कहीं खुशी, कहीं गम’, असे चित्र दिसून आहे. बदल्या झालेल्या ठाणेदारांनी नवीन ठिकाणचे पदभार शनिवारी स्वीकारले आहेत.
पोलीस आयुक्तांच्या आदेशाने शुक्रवारी रात्री उशिरा ठाणेप्रमुखांच्या बदल्यांचे आदेश निघाले. यामध्ये अनेकांची खांदेपालट करण्यात आली आहे. सर्वाधिक ‘क्रीम’ समजले जाणारे एमआयडीसी वाळूज पोलीस ठाणे मिळविण्यात वाळूज ठाण्याचे प्रमुख संदीप गुरमे यांनी बाजी मारली. सिडको व सिटीचौक आणि छावणी व मुकुंदवाडी पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांची अदलाबदल केली. हर्सुलचे प्रमुख वाळूजला पाठविण्यात आले. वेदांतनगरचे प्रमुख सुरक्षा शाखेत, तर उस्मानपुरा ठाणे प्रमुखांना अर्ज चौकशी शाखेत पाठविण्यात आले. एमआयडीसी वाळूजला असलेेले प्रशांत पोतदार यांना बेगमपुराचे ठाणेदार बनविले. त्याचवेळी छावणी वाहतूक शाखेत असलेले दिलीप गांगुर्डे यांना पुंडलिकनगरचे प्रमुख बनविले. सायबरच्या गीता बागवडे यांना उस्मानपुरा ठाण्याची कमान सोपविण्यात आली. क्रांतिचौकचे दुय्यम निरीक्षक अमोल देवकर यांची हर्सुलला ठाणे प्रमुख बदली करण्यात आली. त्याचवेळी राज्य गुप्तवार्ता विभागातून आलेले ब्रह्मा गिरी यांना दुय्यम निरीक्षक म्हणून मुकुंदवाडीत संधी देण्यात आली आहे.
एकूण १३ निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यातील चार जणांचा कार्यकाळ पूर्ण झालेला होता. त्यात संदीप गुरमे, रामेश्वर रोडगे, मनोज पगारे आणि अशोक गिरी यांचा समावेश आहे. याशिवाय दिलीप तारे, अमोल देवकर व प्रशांत पोतदार यांची प्रशासकीय कारणास्तव बदली केली आहे. त्याचवेळी संभाजी पवार, सचिन सानप, सचिन इंगोले, शरद इंगळे, दिलीप गांगुर्डे, गीता बागवडे यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला नसताना त्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
चौकट..............
घनश्याम सोनवणे यांच्या नावाची चर्चा
पुंकडलिकनगरचे ठाणेदार सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या जागी वाहतूक शाखेतून दिलीप गांगुर्डे यांची नेमणूक केली आहे. मागील दोन वर्षांपासून विविध उपक्रमांमुळे प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या सोनवणे यांना नव्या बदल्यांमध्ये ठाणेदारपदी स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांच्या नावाची दिवसभर चर्चा होती. सोनवणे यांना आता सहायक निरीक्षकांच्या बदल्यांमध्ये कोणते ठिकाण मिळते, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
चौकट,
सहायक निरीक्षक, उपनिरीक्षकांचा नंबर
शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यानंतर ठाणेदारांची खांदेपालट करण्यात आली आहे. यानंतर आता सर्वांच्या नजरा सहायक निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या बदल्यांकडे लागले आहे. त्याविषयीचे आदेशही लवकरच निघणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.