बीड : जिल्हा परिषदेत संख्याबळ कमी असताना कार्यकर्त्यांचा कुठल्याही परिस्थितीत सत्ता स्थापन केली पाहिजे असा आग्रह होता. पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिकूल परिस्थितीतही सत्ता खेचून आणली. त्यामुळे कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळाली असून, त्याचे समाधान असल्याचे प्रतिपादन खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी केले.जिल्हा परिषदेत शुक्रवारी अध्यक्षा सविता गोल्हार, उपाध्यक्षा जयश्री मस्के, समाजकल्याण सभापती संतोष हंगे, महिला बालकल्याण सभापती शोभा दरेकर, सभापती राजेसाहेब देशमुख, युध्दजित पंडित यांनी पदभार स्वीकारला. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. खा. मुंडे म्हणाल्या, अनुकूल परिस्थिती असताना कोणीही सत्ता स्थापन करू शकते. मात्र, प्रतिकूल परिस्थितीत वाट काढणे अवघड असते. गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यामुळे संकटातून कसे सावरायचे याची सवय त्यांनीच आम्हाला लावली. शिवसेना, शिवसंग्राम, राष्ट्रवादी, काँग्रेस या पक्षांनीही सहकार्य केले. त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांनी पाहिलेले जि.प. तील सत्ता स्थापनेचे स्वप्न साकार झाल्याचे त्या म्हणाल्या. जि.प.तील सर्व पदाधिकारी पारदर्शक काम करून ग्रामीण जनतेचे प्रश्न सोडवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काही चुकीचे झाले तर कान खेचायला मी आहेच, असा सबुरीचा सल्ला देण्यासही त्या विसरल्या नाहीत.प्रास्ताविक विजय गोल्हार यांनी केले. ते म्हणाले, गोपीनाथ मुंडे यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर विश्वास दाखवला. हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्यात येतील. भाजपकडे अवघे २० सदस्य असताना सत्ता येईल असे स्वप्नातही वाटले नाही. मात्र, पंकजा मुंडे यांनी सर्वांच्या सहकार्याने सत्ता स्थापन केली.यावेळी संजय दौंड, रमेश आडसकर, राजेंद्र मस्के, पं.स. सभापती मनीषा कोकाटे, भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, अॅड. सर्जेराव तांदळे, राजेंद्र बांगर, शेख फारूक, शिवसंग्राम जिल्हाप्रमुख प्रभाकर कोलंगडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन मारूती तिपाले यांनी केले. (प्रतिनिधी)
प्रतिकूल परिस्थितीत सत्ता मिळविल्याचे समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2017 00:05 IST