जालना : येथे गत नऊ वर्षांपासून रखडत असलेल्या घनकचरा प्रकल्पाची केेंद्रीय नियंत्रण मंडळ व महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी पाहणी करून पालिका मुख्याधिकारी तसेच कंत्राटदारांना सूचना दिल्या. सदर काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे सांगितले. येथील घनकचरा प्रकल्पच्या कोनशिलेचे अनावरण तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते १५ जानेवारी २००९ मध्ये करण्यात आले. तब्बल सात वर्षानंतरही हा प्रकल्प मार्गी लागू शकलेला नाही. हा प्रकल्प वेळेत पूर्ण का झाला नाही म्हणून केंद्राच्या लोकलेखा समितीने ठपका ठेवला.त्यानंतर केंद्रीय प्रदूषण व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी प्रकल्पाची सविस्तर पाहणी केली. यावेळी प्रकल्पातील काही भागाचे काम करणाऱ्या कंत्राटदराचे प्रतिनिधीही यावेळी उपस्थित होते. अधिकाऱ्यांचे पथक दहा वाजता शहरात दाखल झाले. शहरातील विविध जमा होणाऱ्या कचऱ्याचीही त्यांनी पाहणी केली. डम्पिंग ग्राऊंडलाही भेट दिली. त्यानंतर सामनगाव येथील पथदर्शी घनकचरा प्रकल्पाची तासभर पाहणी केली. केंद्रीय बोर्डाचे नायडू, लोखंडे, तर राज्य बोर्डाचे संजय वाघ, व्ही.पी. शेळके यांचा पथकात समावेश होता. सोबत मुख्याधिकारी संतोष खांडेकर, अभियंता रत्नाकर आडसिरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. केंद्रीय प्रदूषण मंडळाकडून ५४ लाखांचा निधी या प्रकल्पासाठी प्राप्त झाला होता. त्यातून काय काम झाले याचीही पाहणी यावेळी पथकाने केली. स्क्रॅप मिक्सिंग बिल्डींग, स्क्रॅप स्टोअर बिल्डींग, अंतर्गत रस्ते, वजन काटा इ. कामे झाली आहेत. अद्यापही प्रयोगशाळेसह अनेक महत्त्वाची कामे बाकी आहेत. दोन वर्षांत हा प्रकल्प कार्यान्वित होणे गरजेचे होते. प्रत्यक्षात सात वर्षे उलटूनही येथे कोणतेही काम पूर्ण झाले नाही हे विशेष. सात वर्षांत या प्रकल्पाचे दहा टक्केच काम पूर्ण झाल्याचे चित्र आहे. येत्या वर्षभरात हा प्रकल्प कार्यान्वित होईल असे नगर पालिकेतील स्थानिक अधिकारी सांगत आहेत.यावेळी पालिकेचे अधिकारी व कर्मचारी तसेच काही लोकप्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
घनकचरा प्रकल्प वेळेत व्हावा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2016 00:32 IST