कोरोना संसर्गामुळे मागील दीड वर्षापासून सिद्धार्थ उद्यान बंद ठेवण्यात आले होते. प्राणिसंग्रहालय आजपर्यंत बंदच ठेवण्यात आलेले आहे. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने परवानगी दिल्यानंतरच प्राणिसंग्रहालय उघडण्यात येणार आहे. काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग झपाट्याने कमी झाल्यानंतर ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत लावण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यानुसार महापालिकेने गेल्या आठवड्यात नागरिकांसाठी उद्याने खुली केली. पर्यटकांसाठी आकर्षण केंद्र असलेल्या सिद्धार्थ उद्यानात काही दिवसांपासून गर्दी वाढली आहे. वर्षभरापासून घरात बसून कंटाळलेले नागरिक आता हळूहळू घराबाहेर पडत आहेत. सिद्धार्थ उद्यानात अनेक कुटुंबे येत आहेत. १४ जूनपासून उद्यान सुरू झाले. रविवारपर्यंत ६ हजार २४७ जणांना हजेरी लावली. त्यात ५ हजार २१० वयस्क, तर १ हजार ३७ बालकांचा समावेश होता. महापालिकेला १ लाख १४ हजार ५७० रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचे विजय पाटील यांनी सांगितले.
सिद्धार्थ उद्यानाला आठवडाभरात सहा हजार नागरिकांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:04 IST