संजय कुलकर्णी , जालनाजिल्हा निर्मितीपासून भूमि अभिलेख कार्यालयाचा विस्तार झालेला नाही. परंतु आता या कार्यालयाचे भाग्य उजळणार असून नगर भूमापनकरीता स्वतंत्र सहा पर्यवेक्षक भूमापकांची नियुक्ती आगामी एक-दीड महिन्यात केली जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. जिल्हा निर्मितीनंतर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण म्हणून जालना शहराचा विस्तार वाढू लागला. गेल्या २० वर्षात हा विस्तार झपाट्याने झाला. त्यामुळे शहरातील मालमत्तांची संख्या ५० हजारांवर पोहोचली. या मालमत्तांची संख्या लक्षात घेता भूमि अभिलेख विभागाचे स्वतंत्र नगर भूमापन कार्यालय असणे आवश्यक आहे. परंतु २००८-०९ मध्ये स्वतंत्र कार्यालयासाठी मंजुरी मिळाल्यानंतर देखील प्रत्यक्षात कार्यालय अस्तित्वात आलेले नाही. त्यामुळे जिल्हा व तालुका कार्यालयांमध्ये १९७६ च्या पदस्थापनेनुसारच अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या आहे. कामाचा ताण वाढू लागल्याने या कार्यालयात नवीन बदलून येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्याही कमी आहे. यापूर्वी भूमि अभिलेख कार्यालय म्हणून शासनाकडून मिळणाऱ्या सुविधांचाही मोठ्या प्रमाणावर अभाव होता. मात्र गेल्या महिनाभरापासून या कार्यालयास काही नवीन सुविधा मिळण्यास प्रारंभ झाला आहे. यामध्ये सीसीटिव्ही कॅमेऱ्यांबरोबरच जमिनीची जलद मोजणी करणारे १० एटीएस मशीन मिळणार आहेत. उपअधीक्षक पदाचा पदभार सध्या भोकरदनच्या अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त म्हणून सोपविण्यात आलेला आहे. परंतु या पदावर नवीन अधिकाऱ्यांची लवकरच नेमणूक केली जाणार आहे. मालमत्ता संख्येच्या तुलनेत या कार्यालयात १० पर्यवेक्षक भूमापकांची गरज आहे. परंतु प्रत्यक्षात तीनच पदे मंजूर असून त्यापैकी दोन रिक्त आहेत, तर एक दीर्घ रजेवर आहे. त्यामुळे सध्या या तिन्ही पदांवर प्रतिनियुक्ती केलेले कर्मचारी कार्यरत आहेत. परंतु आता तीन पदे वाढवून नव्याने सहा कर्मचारीही नियुक्त केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. (समाप्त)
नगरभूमापनला मिळणार सहा पर्यवेक्षक
By admin | Updated: April 14, 2015 00:35 IST