औरंगाबाद : खालावलेली भूजल पातळी आणि सिंचन प्रकल्पांमधील अत्यल्प पाणीसाठा यामुळे जिल्ह्यास लवकरच भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी मार्चअखेरीस तब्बल सहाशे टँकरची गरज भासू शकते, अशी माहिती आज पालकसचिव संजयकुमार यांच्या उपस्थितीत झालेल्या टंचाई आढावा बैठकीत समोर आली. जिल्ह्याचे पालकसचिव तथा अल्पसंख्याक विभागाचे प्रधान सचिव संजयकुमार यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा घेतला. बैठकीला विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल, जिल्हाधिकारी विक्रम कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, अप्पर जिल्हाधिकारी किसनराव लवांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुरुवातीला टंचाईची सद्य:स्थिती आणि संभाव्य परिस्थितीची माहिती देण्यात आली. जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीच्या केवळ ६२ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे आॅगस्टपासून पाणीटंचाई जाणवण्यास सुरुवात झाली आहे. सध्या जिल्ह्यात १४ गावांना २२ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र, दिवसेंदिवस खालावत जाणारी भूजल पातळी आणि लघु व मध्यम प्रकल्पातील अत्यल्प साठा यामुळे येत्या काळात भीषण टंचाई भासणार आहे. मार्चअखेरपर्यंत टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढणार आहे. या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे ६०० टँकरची गरज भासण्याची शक्यता आहे. १निसर्गाने पावसाचे वेळापत्रक बदलले आहे. त्याचा पीक पेरणीवरील परिणाम उत्पादकतेच्या स्वरूपात दिसून येतो. म्हणून पावसावर आधारित पीक पेरणीचा कालावधी ठरविल्यास उत्पादनात घट येणार नाही, असे पालकसचिव संजयकुमार म्हणाले. २नेहमी उद्भवणाऱ्या पीक परिस्थितीवर काही उपाययोजना कराव्या लागतील. पिकांना कमी पाण्यात पोषण देणाऱ्या हायड्रोपॉलिमरचा वापर करता येतो का हे पाहावे. हायड्रोपॉलिमर हे जमिनीवर आच्छादले जाते व ते आयात करावे लागेल. ३त्याचप्रमाणे हायड्रोफोनिक्स या तंत्रज्ञानाचा वापर हरितगृहात केल्यास तृणधान्य चांगले घेता येते याचाही वापर करता आल्यास पाहावे, अशी सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केली.
मार्चअखेरीस जिल्ह्यात लागणार सहाशे टँकर
By admin | Updated: November 19, 2014 01:01 IST