यावर्षी रमजान पर्वासह ईदवर कोरोनाचे सावट असल्यामुळे फारसा उत्साह पाहावयास मिळाला नाही. सालाबादप्रमाणे गजबजणारे ईदगाह मैदान यंदा ओस पडले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुस्लीम समाजबांधवांनी खबरदारी म्हणून सामूहिक नमाज पठण रद्द केले. नागरिकांनी आपापल्या घरांतच नमाज पठण करून साधेपणाने ईद साजरी केली. शहरातील ईदगाहकडे जाणाऱ्या रस्त्यांवर कमालीचा शुकशुकाट जाणवत होता. ईदनिमित्त मुस्लिम बांधव एकमेकांना आलिंगन देऊन शुभेच्छा देत असतात. मात्र, यंदा आलिंगन देण्याचे टाळून एकमेकांना भ्रमणध्वनीवरच शुभेच्छा दिल्या. शहरासह तालुक्यात लॉकडाऊन नियमांचे व जमावबंदी, संचारबंदी कायद्याचे पूर्णपणे पालन करण्यात आले.
चौकट...
धर्मगुरूंचे आवाहन
राज्य सरकारच्या वतीने जिल्हा व पोलीस प्रशासनाने केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन मुस्लीम धर्मगुरूंनी केले होते. यामुळे सकाळी मुस्लीमबहुल भागातसुद्धा फारशी लक्षवेधी लगबग दिसून आली नाही. कुठल्याही मशिदीच्या आवारात समाजबांधव जमले नाही. युवकांनीदेखील संयम बाळगत धर्मगुरूंच्या आवाहनाला साद देत घरातच ईदची नमाज पठण केली. मुस्लीम बांधवांनी यावेळी अल्लाहकडे सगळ्यांना आरोग्यदायी जीवन देण्याची दुआ मागितली.