सिल्लोड : बैलपोळा फुटण्याच्या वेळेवर सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास शहरास तालुक्यास धुवाधार पावसाने झोडपल्याने अनेक घरांत पाणी घुसले. तालुक्यात तर काही ठिकाणी ढगफुटी वाटावी असा पाऊस झाला. यामुळे भराडी, वांगी, मोढा, धानोरा, वांजोळा, अन्वी, पालोद, मंगरूळ, डोंगरगाव, वरुडसह परिसरातील अनेक गावांच्या शिवारात खरीप हंगामातील मका आडवा झाल्याने त्यापासून आता शेतकऱ्यांना काहीही आमदानी हाती येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदा पेरणीसाठी पावसाने केलेला उशीर व त्यानंतर पेरणी झाल्यावर दिलेला ताण शेतकऱ्यांना नाउमेद करणारा ठरला. त्यातून कसेबसे सावरत नाही तोच सोमवारी सायंकाळी अवकाळी स्वरूपाच्या या पावसाने शेतातील उभी पिके आडवी केली. पावसाने जीवदान दिल्याने खरीप हंगामातील पिकांच्या आशा वाढल्या होत्या, त्या आशा आता मावळल्याचे चित्र दिसते आहे. याविषयीची माहिती मिळताच पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य व्यवसायमंत्री अब्दुल सत्तार, ज्येष्ठ नेते प्रभाकरराव पालोदकर यांनी अन्वी, पालोद परिसरातील शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. ऐन पोळा फुटण्याच्या वेळेवर आलेल्या या पावसाने हा सण विस्कळीत झाला. पावसाचा जोर एवढा मोठा होता की, शहरातील स्नेहनगर, अब्दालशानगर, छत्तीस एकर परिसर, श्रीकृष्णनगर परिसर आदी अनेक ठिकाणी सखल भागातील घरात पाणी शिरले. त्यामुळे ऐन सणाच्या दिवशी घरातील पाणी काढण्याचे काम नागरिकांना करावे लागले. नगरसेवक अब्दुल समीर, राजरत्न निकम यांनी नागरिकांची भेट घेऊन दिलासा दिला. फुलंब्री : तालुक्यात रविवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. यात सुमारे २०० हेक्टर क्षेत्रातील मक्याचे पीक भुईसपाट झाले. पानवाडी या गावातील सुमारे दीडशे शेतकऱ्यांनी मक्याची लागवड केली होती. पीक चांगल्या स्थितीत असताना रविवारी व सोमवारी पडलेल्या जोरदार पावसाने चांगलेच झोडपले. यात मका पीक भुईसपाट झाले. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना मका पिकावरच भरवसा होता. अशात पिकाची नासाडी झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. फुलंब्री येथील आनंदा ढोके, जयपाल राजपूतसह स्थानिक शेतकऱ्यांचा मका जमीनदोस्त झाला आहे. ४करंजखेड : खरीप पिके करपली जात असताना मघा नक्षत्राने मात्र शेतकऱ्यास चांगलाच दिलासा दिला. २३, २४, २५ आॅगस्टला जोरदार पावसाच्या सरी कोसळल्यामुळे पिकांना जीवदान मिळाले. २४-२५ आॅगस्टच्या पावसाने नदी-नाल्यांना प्रथमच पूर आला होता. सलग दोन वर्षांतील तीन हंगामातील संकटांच्या जणू मालिकाच शेतकऱ्यांभोवती येताना दिसतात. या अस्मानी संकटांच्या मालिकांनी त्यांना जेरीस आणल्याचे चित्र आहे. अशा संकटांनी शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीस आल्याचे दिसते. संकटे पिच्छा सोडायला तयार नाही. यामुळे निसर्गापुढे काय करावे, हा सवाल त्यांच्यासमोर आ वासून उभा ठाकला.