औरंगाबाद : जिल्ह्यातील सिल्लोड, फुलंब्री, खुलताबाद, सोयगाव, कन्नड या तालुक्यांमध्ये शुक्रवारी काही ठिकाणी जोरदार, तर काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळणार असून, फुलंब्री येथील फुलमस्ता नदीला या पावसाळ्यात पहिल्यांदाच पूर आला आहे. नदी दुथडी भरून वाहत आहे. फुलंब्री तालुक्यात मागील दोन दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली आहे. मागील अडीच महिन्यांपासून फक्त हलका पाऊस पडत होता. यामुळे पाणी पातळीत वाढ झाली नाही; मात्र पिके चांगली आहेत. फुलमस्ता नदीला आलेल्या पुराचे पाणी फुलंब्री प्रकल्पात जाते. खुलताबाद परिसरात दुपारी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. आता मात्र पिके पुन्हा काही दिवस तग धरतील, असा आशावाद शेतकऱ्यांना आहे. सिल्लोड तालुक्यातील भराडी, अंभई, अजिंठा, आमठाणा, गोळेगाव, निल्लोड, बोरगावबाजार, सराटी, बोदवड, खंडाळा, पिंपळदरी, बाळापूर परिसरात शुक्रवारी सकाळी हलकासा पाऊस झाला. १८ दिवसांनंतर पाऊस आल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या; मात्र मोठी उघडीप दिल्याने उत्पन्नात प्रचंड घट होणार असल्याचे शेतकऱ्यांमध्ये बोलले जाते. लासूर स्टेशन परिसरातही यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच तब्बल दीड तास दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी आनंदी आहेत. पोळा दोन दिवसांवर आला असून सण उत्साहात साजरा करण्यास शेतकरी सज्ज झाले आहेत. (ठिकठिकाणच्या वार्ताहरांकडून)कन्नड तालुक्यात दुपारपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली. अधूनमधून पडत असलेल्या या पावसामुळे कोमेजलेली पिके तरारली आहेत. गेल्या २४ तासांत सहा मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पिशोर महसूल मंडळात २६ मि.मी. पाऊस कोसळला आहे. शुक्रवारी वासडी परिसरात दमदार पाऊस पडला. अंजना नदीला या पावसामुळे प्रथमच पूर आला आहे. दुपारी तीनच्या सुमारास कानडगाव, खामगाव, औराळी, नागद, येथेही मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.
सिल्लोड, फुलंब्रीत जोरदार पाऊस
By admin | Updated: August 23, 2014 00:50 IST