औरंगाबाद : दिल्ली येथील प्राणिसंग्रहालयात एका २० वर्षीय युवकाला वाघाचे शिकार व्हावे लागले. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर देशभरातील प्राणिसंग्रहालयांतील सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला आहे. औरंगाबाद मनपाच्या प्राणिसंग्रहालयातील पिंजरे गंजले आहेत. सुरक्षारक्षक नाहीत. खंदक कमकुवत झाले आहेत. त्यामुळे या प्राणिसंग्रहालयातदेखील भविष्यात दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बी.एच. नाईकवाडे म्हणाले की, प्राणिसंग्रहालयातील पिंजरे कमजोर झालेले आहेत. सुरक्षारक्षक कमी आहेत. प्राणिसंग्रहालयात सुरक्षा मोठ्या प्रमाणात असणे गरजेचे आहे. वाघाच्या पिंजऱ्यासमोरील खंदक कमजोर झाले आहेत. दुर्दैवाने प्राणिसंग्रहालयात अपघात झाला, तर धोका होणार नाही. मात्र, सुरक्षारक्षक कमी आहेत. पिंजरे गंजले आहेत. अशा परिस्थितीत काहीही सांगता येणार नाही. बांधकाम विभागाकडे डागडुजीच्या कामाची मागणी केली आहे, तर सुरक्षा विभागाकडे रक्षकांची मागणी केली आहे. ८० लाख रुपयांचा खर्च या कामासाठी लागेल; परंतु त्यासाठी पुरेशी तरतूद अजून झालेली नाही. आराखड्यावर साचली धूळ महापालिकेच्या सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयाला अवकळा आली आहे. संग्रहालयातील प्राण्यांचे पिंजरे खराब झाले आहेत. अंतर्गत रस्ते, पथदिवे, पाणीपुरवठा करणारी यंत्रणा मोडकळीस आली आहे. संग्रहालयाच्या नूतनीकरणासाठी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने मंजूर केलेला ५० कोटी रुपयांचा आराखडा निधीअभावी १ वर्षापासून धूळखात पडला आहे. पावसाळ्यात पिंजऱ्यांना गळती लागली. ससे, वाघ, कासव, हरिण, माकडांचे पिंजरे खराब झाले आहेत. मिटमिट्याची जागा अधांतरीमिटमिट्यात १०० एकर जागा मिळण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र, ती जागा सध्या मिळणे अवघड आहे. त्यामुळे २० एकर जागा ताब्यात घेऊन ३४ एकरांमध्ये प्राणिसंग्रहालयातील बांधण्यात येणार आहे. सध्या १४ एकरमध्ये प्राणिसंग्रहालय आहे. संग्रहालयाची संरक्षक भिंत ५० लाख, ड्रेनेज, पाणी, वीजपुरवठा, सेव्हेज नियोजनसाठी दीड कोटी रुपये, ५० हजार लिटरच्या जलकुंभासाठी २० लाख रुपये, पार्किंग, सर्व्हिस रोड, लाईट, इमारतींसाठी ७० लाख रुपये, मुख्य रस्त्यासाठी दीड कोटी रुपयांची तरतूद दाखविली आहे.
सिद्धार्थ प्राणिसंग्रहालय धोकादायक
By admin | Updated: September 24, 2014 01:06 IST