शिरूर अनंतपाळ : आहारातून तिखट आणि मीठ गायब झाले तर तो आहार बेचव होतो़ त्यामुळे तिखट आणि मिठाचे संतुलन राहणे अतिशय गरजेचे आहे़ परंतु, सध्याच्या महागाईमुळे हे मिरची वापराचे संतुलन बिघडत आहे़ मिरचीचा भाव सव्वाशे रूपये किलो झाला आहे़ महागाईपुढे मिरचीचा तडका कमी झाल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे़मराठवाड्यातील नागरिकांचे प्रमुख अन्न म्हणजे ज्वारीची भाकरी आणि तुरीची डाळ आहे़ दाल तडक्यास अधिक पसंती दिली जाते़ परंतु, मिरचीचे भाव दिवसेंदिवस वाढत चालल्याने दाळीचा तडका सौम्य बनला आहे़ स्वयंपाकात मिरची वापर जपून करण्याची पाळी गृहिणींवर आली आहे़ बाजारात मिरचीची आवक घटल्याने भाव आणखी वाढतील अशी चर्चा आहे़त्यामुळे चटणी, लोणचे, मसाला यातही बेताने तिखट वापरावे लागत आहे़ आहारातील रूचकरता वाढावी यासाठी झणझणीत शेरवा (रस्सा) केला जातो़परंतु, मिरची जपून वापरावी लागत असल्याने शेरव्याची चव बदलल्याचे खव्वयांनी सांगितले़ एकंदरच मिरचीचे वाढते भाव थेट आहारावर परिणाम करीत असून, आहारातील तडक्यास फटका बसत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत़ (वार्ताहर)
महागाईपुढे मिरचीचा तडका कमी
By admin | Updated: June 21, 2015 00:21 IST