अंबड : अंबड येथील बाजार समितीत नाफेड तूर खरेदी मंगळवारी पुन्हा सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. केंद्रातील एक काटा बंद करण्यात आला होता. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तूर विक्रीसाठी आणली होती. अचानक तुरीची आवक वाढल्याने बाजार समितीने ६ मार्चपर्यंत तूर खरेदी विक्रीचे व्यवहार तुर्तास थांंबविले होते. याबाबत लोकमतने सोमवारी शेतकऱ्यांची होत असलेली गैरसोय बाबत सविस्तर वृत्त प्रकाशित करताच मंगळवारी नाफेडच्या वतीने एका काटा सुरू करून तूर खरेदीस सुरूवात केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. तालुक्यात यंदा मुबलक पाऊस झाल्याने तालुक्यात तुरीचे विक्रमी उत्पन्न निघत आहे. परिणामी गेल्या आठवड्यापासून बाजार समितीत तुरीची आवक प्रचंड प्रमाणात वाढली. आठवड्यापासून बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर आणि बैलागाडीत तूर टाकून बाजार समितीत विक्रीस आणली होती. परंतु अंबड बाजार समितीस ६ मार्चपर्यंत तूर खरेदी बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. बाजार समिती आवारात तूर विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांची जवळपास अडीचशे ट्रॅक्टर आदी वाहनांची गर्दी झाल्याने व केवळ एकच तूर खरेदी केंद्र सुरु असल्याने शेतकऱ्यांना कित्येक दिवसांचा मुक्काम करावा लागणार असल्याने हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे बाजार समितीने कळविले आहे. नाफेडने विविध ठिकाणी तूर खरेदी केंद्र सुरु केले. अंबड येथील तूर खरेदी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने शेतकऱ्यांची गैरसोय झाली होती.
नाफेडचे खरेदी केंद्र सुरू
By admin | Updated: March 1, 2017 01:08 IST