औरंगाबाद : महानगरपालिकेला कर भरूनही सामान्य नागरिकांना मूलभूत सेवा-सुविधा देण्याविषयी उदासीन भूमिका असल्याने शिवनेरी कॉलनीत चिखलाची दलदल आणि जिन्सी, संजयनगर बी-२ आणि ए-४ मधील नागरिकांना अपुरा व दूषित पाणीपुरवठा होत असल्याने आरोग्याच्या कटकटी वाढल्या आहेत. अडीच इंची जलवाहिनीतून पाणी मिळावे म्हणून शेकडो मोटारींची ‘झुंज’ संजयनगरात पाहावयास मिळते. जलवाहिनी कोरडीठाक असून, निम्म्याहून अधिक महिला व नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सांडपाण्याच्या गटारीची सफाई होत नसल्याने दुर्गंधी व डासांचा त्रास वाढला असून, थंडीताप व डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. वॉर्ड ८४ मधील शिवनेरी कॉलनी खेड्यात की शहरात याचा अंदाजच नागरिकांना येत नाही. कारण पदोपदी दलदल असून, शाळकरी मुलांना शाळेत ने-आण करणाऱ्या गाड्याही कॉलनीत येऊ शकत नाहीत. त्यामुळे पालकांना सर्व कामे बाजूला ठेवून ही जबाबदारी पार पाडावी लागते. अनेकदा चिखलात घसरून वृद्ध व मुले पडल्याने जखमी होत आहेत. वीजपुरवठा करणारे जीटीएलचे खांब उपलब्ध नसल्याने लाकडाचा टेकू द्यावा लागत आहे. सोसाट्याच्या वाऱ्यात लाकडी टेकू पडल्यास अनर्थ होण्याची भीतीही आहे.
शिवनेरी कॉलनीत चिखल अन् संजयनगरात दूषित पाणी
By admin | Updated: September 13, 2014 00:37 IST