औरंगाबाद : महापालिकेच्या पोटनिवडणुकीत लक्षवेधी ठरवलेल्या बेगमपुरा- पहाडसिंगपुरा वॉर्डात अखेर खा. चंद्रकांत खैरे यांनी विरोधकांबरोबरच पक्षांतर्गत विरोधकांनाही ‘डाव’ मारत चीत केले अन् आपल्या पुतण्याला ‘एकहाती’ विजय मिळवून देत हा राजकीय ‘आखाडा’ मारला. तर दुसरीकडे ‘हवेत’ असलेल्या मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीनचा (एमआयएम) बुढीलेन-कबाडीपुरा हा बालेकिल्ला होता. त्यांना आपला वॉर्ड राखण्यात अपयश आले. या वॉर्डात राष्ट्रवादीच्या घड्याळाने एमआयएमच्या उमेदवाराचा दारुण पराभव करून एमआयएमची ‘हवा’ काढून घेतली. महानगरपालिकेच्या या दोन्ही वॉर्डांमधील पोटनिवडणूक शहराची बदलत्या ‘राज’कारणाची नांदीच ठरली. चंद्रकांत खैरेंची प्रतिष्ठा वाचलीऔरंगाबाद : बेगमपुरा वॉर्डात खा. चंद्रकांत खैरे यांनी आपला पुतण्या सचिन खैरे यांना उमेदवारी मिळवून देऊन ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे या वॉर्डाकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते. त्यातच खैरे यांच्या उमेदवारीला पक्षांतर्गत विरोध मोठ्या प्रमाणात दिसून आला. शिवसेनेचे अनेक नेते प्रचारात मनाने सहभागी नसल्याचे जाणवत होते. त्यामुळे विरोधकांबरोबरच स्वपक्षीयांचा विरोध मोडीत काढून आपल्या पुतण्याला निवडून आणण्याचे मोठे आव्हान खैरे यांच्यासमोर होते. त्यामुळे कोण ‘बाजी’मारणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले होते. सोमवारी सकाळी १० वाजता बेगमपुरा वॉर्डाच्या मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्याच फेरीत शिवसेनेचे सचिन खैरे यांनी ४०३ मते मिळवून आघाडी घेतली. त्यांचे निकटतम प्रतिस्पर्धी अनिल भिंगारे यांना २६९ मते पडली. दुसऱ्या फेरीतही सेनेची ‘जादू’ कायम राहिली. खैरे यांना ४६१ तर भिंगारे यांना २०८ मते मिळाली. दोन्ही फेरीमध्ये सेनेने ३८७ मतांची विक्रमी आघाडी घेतली. पुढील प्रत्येक फेरीत सचिन खैरे यांच्या आघाडीला शह देण्यात अनिल भिंगारे यांना यश आले नाही. पहाडसिंगपुरा भागातील ईव्हीएम मशीनची मोजणी सुरू झाल्यावर उलट अनिल भिंगारे यांच्या मतांचे विभाजन सुरू झाले. काँग्रेसचे संतोष भिंगारे यांनी आठ फेऱ्यांमध्ये ८२७ मते घेतली. मतमोजणीअखेर खैरे यांना २९०३ तर अनिल भिंगारे यांना २१८० मते पडली. ७२३ मतांनी सचिन खैरे विजयी ठरले. एमआयएमच्या बालेकिल्ल्याला सुरुंगऔरंगाबाद : बुढीलेन- कबाडीपुरा हा वॉर्ड एमआयएमचा बालेकिल्ला समजल्या जात होता. राष्ट्रवादीने पोटनिवडणुकीत एमआयएमच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्याबरोबरच एमआयएमची ‘हवा’ही काढून घेतली. बालेकिल्ल्यात एमआयएमच्या उमेदवाराला राष्ट्रवादीकडून दारूण पराभवाचा सामना करावा लागला. बेगमपुऱ्याच्या मतमोजणीसोबतच बुढीलेन वॉर्ड क्र. २१ ची मतमोजणी सुरू होती. पहिल्याच फेरीत एमआयएम पक्षाच्या उमेदवार शहेनाज बेगम खाजामियाँ यांनी १९२ मते मिळवून आघाडी घेतली. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार परवीन कैसर खान यांना १४६ मते मिळाली. दुसऱ्या फेरीतही ‘एमआयएम’चा झंझावात दिसून आला. शहेनाज बेगम यांना ११५ तर परवीन खान यांना ९४ मते मिळाली. दोन फेऱ्यांमध्ये एमआयएमने ६७ मतांची आघाडी घेतली. त्यामुळे मनपा प्रशासकीय इमारतीसमोर उभ्या असलेल्या एमआयएम कार्यकर्त्यांमध्ये एकच उत्साह संचारला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. किलेअर्क, पंचकुंआ भागातील ईव्हीएमची मतमोजणी सुरू होताच राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारली. पुढील प्रत्येक फेरीत राष्ट्रवादीने निर्णायक आघाडी घेतली. ३१६ मतांच्या आघाडीने परवीन कैसर खान विजयी झाल्या. एमआयएमच्या शहेनाज बेगम यांना ११४३ तर अपक्ष तरन्नूम अकील यांना ५९२, काँग्रेसच्या निखत झैदी यांना ४९४ मतांवर समाधान मानावे लागले.विजयी मिरवणूकशिवसेनेने महापालिकेपासून बेगमपुऱ्यापर्यंत विजयी मिरवणूक काढली. ढोल-ताशांच्या गजरात ही मिरवणूक काढण्यात आली. यावेळी खा.चंद्रकांत खैरे यांच्यासह जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, राजू वैद्य, नंदकुमार घोडेले, बाळू थोरात, संतोष जेजूरकर, हिरा सलामपुरे, माजी महापौर कला ओझा, सुनीता आऊलवार, प्रतिभा जगताप, गणू पांडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. सेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी सोमवारीही बेगमपुऱ्याकडे पाठ केली होती.वॉर्डातील मतदारांनीही आपल्यावर विश्वास दाखवून निवडून दिले. मागील २० वर्षांमध्ये बुढीलेनचा अजिबात विकास झालेला नाही. कबाडीपुरा, पंचकुंआ, किलेअर्क भागातील नागरिक आजही मूलभूत सोयी-सुविधांपासून वंचित आहेत. येणाऱ्या तीन वर्षांमध्ये वॉर्डाचा कायापालट होईल, हे निश्चित. - परवीन कैसर खान, नगरसेविकावॉर्डाचा सर्वांगीण विकास झालेला नाही. खासदार निधी, महापालिकेचा निधी मिळवून वॉर्डाचा विकास करणे हेच आपले ध्येय आणि ध्यास राहणार आहे. वॉर्डातील सुजाण नागरिकांनी आपल्यावर विश्वास दाखविला असून, या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. - सचिन खैरे, नगरसेवक
शिवसेनेने मारला बेगमपुऱ्याचा ‘आखाडा’; घड्याळाने काढली एमआयएमची ‘हवा’
By admin | Updated: August 30, 2016 01:20 IST