लातूर : लातूरच्या सर्वोपचार रूग्णालयात प्रसुतीसाठी दाखल केलेल्या दैवशाला गव्हाणे यांना उदगीरच्या लाईफ केअर रुग्णालयात सोमवारी दाखल करण्यात आले. दैवशाला यांच्या पोटात चार बाळांचा गर्भ वाढत असून, आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच उदगीरच्या लाईफ केअर रुग्णालयाने त्यांच्या उपचाराची जबाबदारी घेतली. तसेच माजी आमदार चंद्रशेखर भोसले यांनी उपचारासाठी लागणारा खर्च स्वत: करणार असल्याचे सांगून सदरील महिलेस स्वत: उपस्थित राहून सोमवारी लाईफ केअर रुग्णालयात दाखल केले आहे.दैवशाला गव्हाणे यांचे तीन वर्षापूर्वी प्रसुतीसाठी सिझर झाले होते़ पुन्हा तीन वर्षानी त्या गरोदर राहिल्या. पोटात चार बाळांचा गर्भ वाढत असल्याचे वैद्यकीय तपासणीत समोर आल्यावर कुटुंब घाबरून गेले होते. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार उपचार सुरू होते. मात्र कौटुंबिक परिस्थिती हलाखीची असल्याने पुढे काय होणार, असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. काही दिवस मुंबईच्या रूग्णालयात उपचार घेतल्यावर त्यांनी खर्चाअभावी उपचार थांबविले होते. लातूरच्या शासकीय सर्वोपचार रुग्णालयात त्या उपचार घेत होत्या. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने दैवशाला निवृत्ती गव्हाणे यांना मदतीची गरज असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच मदतीचे हात पुढे आले. लाईफ केअर रुग्णालयाच्या संचालिका अर्चनाताई पाटील चाकूरकर, माजी आमदार चंद्रशेखर भोसले यांनी गव्हाणे कुटुंबियाला दिलासा देत उपचारासाठी मदत सुरू केली.
‘ती’ गरोदर महिला उदगीरच्या ‘लाईफ केअर’मध्ये दाखल
By admin | Updated: December 28, 2015 23:25 IST