हिंगोली : पर्यावरण वाढीसाठी राज्य शासनाने सुरू केलेली शतकोटी वृक्ष -लागवड योजनेला प्रशासकीय यंत्रणेच्या अनास्थेमुळे घरघर लागली असून, रोपच उपलब्ध होत नसल्याने शतकोटीची संकल्पानाच मोडीत निघत असल्याचा प्रकार जिल्ह्यातून होताना दिसून येत आहे. वाढत चाललेला पर्यावरणाचा ऱ्हास कमी करण्याच्या दृष्टिकोनातून व वृक्षलागवड वाढावी यासाठी शासनाने शतकोटी वृक्षलागवड योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत प्रारंभी चांगले काम करण्यात आले; परंतु कामातील सातत्य टिकविण्यात प्रशासकीय यंत्रणा कमी पडल्याने या योजनेला घरघर लागल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. शतकोटी वृक्षलागवड योजनेंतर्गत गतवर्षी जिल्ह्यात ११ लाख ८९ हजार ८५७ रोपांची लागवड करण्यात आली होती. त्यामध्ये औंढा नागनाथ तालुक्यात २ लाख ४९ हजार ४६९, वसमत तालुक्यात २ लाख ३८ हजार ५, हिंगोली तालुक्यात ४२ हजार ५९०, कळमनुरी तालुक्यात २ लाख ४८ हजार ४३३ आणि सेनगाव तालुक्यात २ लाख ११ हजार ३६० रोपांची लागवड केल्याचा अहवाल शासनदरबारी आहे. हा कागदोपत्री अहवाल असला तरी आजघडीला यामधील किती रोपे जिवंंत आहेत? हा एक संशोधनाचा विषय ठरणार आहे. अनेक ग्रामपंचायतींनी वृक्ष लागवडीची ही मोहीम कागदावरच राबविली. त्यांचे पितळ उघड पडेल अशी भूमिकाही प्रशासनाकडून घेण्यात आली नाही. वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धन करणेही तितकेच महत्वाचे आहे; परंतु याकडे मात्र सर्वच शासकीय यंत्रणांनी दुर्लक्ष केले. परिणामी लाखांवर लावलेली रोपे आजघडीला हजारातही सापडतील की नाही? याविषयी साशंकता आहे. गतवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड केल्याचा अहवाल जिल्हास्तरीय यंत्रणेचा असला तरी चालूवर्षी मात्र अत्यंत वाईट अवस्था या योजनेची असल्याचे दिसून येत आहे. शतकोटी वृक्षलागवड योजनेंतर्गत यावर्षी जिल्ह्याला ५ लाख रोपे लावण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामध्ये प्रत्येक तालुक्याने १ लाखाचा वाटा उचलायचा आहे. जुलै महिना संपत आला तरी अद्याप वृक्षारोपणाची मोहीम सुरू झालेली नाही. सामाजिक वनीकरण व वनविभागाच्या रोप- वाटिकांमध्ये एकूण ६ लाख रोपे उपलब्ध आहेत. हीच रोपे ग्रामपंचायतींना देण्यात येणार आहेत; परंतु ती कधी देण्यात येतील, याचा मुहूर्त मात्र अद्याप काढण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा या योजनेसंदर्भात किती गंभीर आहे, हेच यावरून स्पष्ट होते. गतवर्षी ११ लाख ८९ हजार ८५७ रोपांची लागवड आणि यावर्षी मात्र ५ लाखांचे उद्दिष्ट या दोन विरोधाभास निर्माण करणाऱ्या बाबी आहेत. रोप वाटिकांमध्ये रोपच उपलब्ध नसल्याने यावर्षी वृक्ष लागवडीचे उद्दिष्टही घटले आहे. त्यामुळे रोपवाटिकेमध्ये जास्तीत जास्त रोपे लावण्याची जबाबदारी आहे तरी कोणाची? असा सवाल उपस्थित होत आहे. गेल्या ३ वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये रोपांची लागवड करण्यात आलेली नाही. कारण गेल्या ३ वर्षांपूर्वी ज्या ग्रामपंचायतींनी रोपे तयार केली होती, त्यांची रोपे एक तर खरेदी केली गेली नाहीत व ज्यांची रोपे खरेदी केली गेली त्यांना मोबदला वेळेवर दिला गेला नाही. त्यामुळेच या रोपवाटिका बंद करण्यात आल्या असल्याचे समजते. (जिल्हा प्रतिनिधी)अद्यापही वृक्षलागवड सुरू नाही गतवर्षी शतकोटी वृक्षलागवड योजनेंतर्गत जिल्ह्यात ११ लाख ८९ हजार ८५७ रोपांची करण्यात आली होती लागवड.लाखांवर रोपांची लागवड केली असली तरी या रोपांचे संवर्धन करण्यात आले नसल्याने सध्या जिवंत रोपांची संख्या कमीच.चालू वर्षी रोपांची उपलब्धता कमी असल्याने जिल्ह्याचे केवळ ५ लाख रोप लागवडीचे ‘शतकोटी’ उद्दिष्ट.सामाजिक वनीकरण व वनविभागाच्या रोपवाटिकांमधून जिल्हा परिषद घेणार रोपे.गेल्या ३ वर्षांपासून जिल्ह्यातील एकाही ग्रामपंचायतीने उभारली नाही रोपवाटिका.३ वर्षांपूर्वी जि.प.ने सांगितलेल्या रोपांची बिले करण्यात आली नव्हती अदा.
सरकारी अनास्थेतून ‘शतकोटी’ला घरघर
By admin | Updated: July 23, 2014 00:21 IST