पुंजाराम शेरे ,शेवगासुरुवातीपासूनच पडत असलेल्या जेमतेम पावसामुळे खरिपाच्या पेरण्या वाया गेल्या आहेत. परिणामी, अंबड तालुक्यावर दुष्काळाची छाया गडद होत आहे.जुलै महिन्याचा दुसरा आठवडा उलटला तरी अद्याप दमदार पाऊस झालेला नाही. शेतकरी हवालदिल आहे. दोन वर्षांपूर्वी पडलेल्या दुष्काळातून शेतकरी अद्यापही सावरलेला नाही. आता पुन्हा दुष्काळाचे संकट डोक्यावर आहे. पावसाअभावी शेतकरी, शेतमजुरांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट बनला आहे. चारा व पाणीटंचाईमुळे जनता मेटाकुटीस आली आहे. ग्रामीण भागातील तरुण रोजगारासाठी शहराकडे धाव घेत आहेत. परिसरात पाऊस नसल्याने मजुरांना काम मिळत नाही. अनेक तरुण रानावनात भटकंती करुन लिंबोळी वेचून त्यावर प्रपंच चालवित आहेत. येणाऱ्या काळात दमदार पाऊस झाला नाही, तर प्रश्न बिकट होणार आहे. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या नुकसानीने शेतकरी हतबल असताना खरिपातही पावसाने दगा दिला. त्यामुळे सोयाबीन, मूग, उडीद, कापूस ही नगदी पिके हातची गेली. रबी हंगामाचा डोलारा असलेला खरीप हंगाम हातचा गेल्याने रबीची सोय करणे जिकिरीचे झाले आहे. रबीसोबतच दैनंदिन व्यवहार चालविण्याचा प्रश्न बिकट बनत आहे. या सर्व बाबींचे निरीक्षण करुन जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला अहवाल सादर करुन अंबड तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी ज्ञानेश्वर शेळके, शंकर शेळके, मधुकर वाघ, कुंडलिक राघवन, दत्ता राऊत, मनोहर खरात, ज्ञानेश्वर तिकांडे, श्याम तिकांडे, बंडू खोरे, रामनाथ खरात, कारभारी शेळके, नवनाथ शेरे, शिवाजी वाघ, सचिन अटकर आदींनी केली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करातालुक्यातील दुष्काळजन्य परिस्थिती लक्षात घेऊन शेतकरी, शेतमजुरांच्या पाल्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यासंदर्भात शासनाने आदेश काढावेत अशी मागणी होत आहे. पावसाअभावी पीकपाणी हातचे गेल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्नच बिकट झालेला आहे. भरमसाठ शुल्क आकारणाऱ्या शाळा, महाविद्यालयांचे तोंड कसे बंद करावे, असा यक्षप्रश्न निर्माण झालेला आहे.ग्रामीण भागात पदवीपर्यंतच्या शिक्षणाची सोय नसल्याने शेतकरी व शेतमजुरांच्या मुलांना शहरी भागात शिक्षणासाठी जावे लागते. वह्या-दप्तरासोबतच शाळेचे शुल्क आणि इतर खर्चाची जुळावा जुळव करताना जनतेच्या नाकीनऊ येत आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांसोबतच सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागत आहे. आठवडी बाजारातील आर्थिक उलाढालीवर मोठा परिणाम झाला आहे.
अंबड तालुक्यावर दुष्काळाची छाया
By admin | Updated: July 20, 2014 00:29 IST