लातूर : महापालिकेला उत्पन्नाचे स्त्रोत म्हणून राज्य शासनाने लागू केलेल्या एलबीटीचा भरणा करण्याकडे लातूरच्या बहुतांश व्यापाऱ्यांनी पाठ फिरविल्याने आता मनपा प्रशासनाने कारवाई मोहीम हाती घेतली आहे़ बँक खाते सील करण्यात येत असल्याने सोमवारी व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास आयुक्तांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले़ मात्र, दराबाबत कसल्याही प्रकारची तडजोड शक्य नसल्याचे सांगत आयुक्तांनी नियमानुसार कारवाया सुरूच राहणार असल्याचे सांगितले़ लातूर शहर महापालिका हद्दीत मनपाने जवळपास ३ हजार २०० व्यापाऱ्यांची एलबीटीसाठी नोंदणी केली होती़ राज्य शासनाने लागू केलेल्या दरानुसार कर भरण्यास व्यापारी महासंघाने विरोध दर्शविला़ प्रारंभीपासूनच व्यापारी महासंघाचे एलबीटीला विरोध दर्शविल्याने बोटावर मोजण्याइतक्या व्यापाऱ्यांनी एलबीटी भरणा केला़ राज्य शासनाने ज्या दिवशी एलबीटी लागू केली त्या दिवसांपासून व्यापाऱ्यांना एलबीटीचा भरणा करावाच लागेल, अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे़ त्यानुसार वसुलीची मोहीम हाती घेण्यात आली आहे़ आयुक्त सुधाकर तेलंग यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक आयुक्त वसुधा फड यांनी गेल्या महिनाभरापासून कारवाई मोहीम गतिमान केली आहे़ एलबीटी भरणा न करणाऱ्या व्यापाऱ्यांचे बँक खाते सील करण्यात येत आहेत़ त्यानुसार १६ जणांचे बँक खातेही सील करण्यात आले आहेत़ (प्रतिनिधी)
एलबीटीवर तोडगा निघेना; व्यापारी संभ्रमात
By admin | Updated: May 12, 2015 00:51 IST