उस्मानाबाद : शहरच नव्हे तर जिल्ह्यातील नगर पालिका हद्दीत ज्यांनी आपापल्या घरातील टीव्हीला ‘सेट टॉप बॉक्स’३१ डिसेंबर पूर्वी बसवलेला नाही़ त्यांच्या घरातील टीव्ही सध्या शोभेची वस्तू बनली असून, केबलचालकांनी अनेक ग्राहकांना वेटींगवर ठेवले आहे़ अचानक मागणी वाढल्याने ‘सेट टॉप बॉक्स’साठी आता १५ ते २० दिवस ग्राहकांना वाट पहावी लागत आहे़ त्यातच ‘डीश’ घ्यावा की ‘सेट टॉप बॉक्स’बसवावा या दुविधेच्या ‘मुंग्या’ही ग्राहकांच्या डोक्यात असून, विक्रेते आपापल्या परीने ‘सेट टॉप बॉक्स’ आणि ‘डीश’चे महत्त्व पटवून देताना दिसत आहेत़मागील दशकापूर्वी गावातील- शहरातील काहींच्याच घरात असलेला ‘टीव्ही’ आज घरोघरी पोहोचला आहे़ टीव्हीवरील कार्यक्रम, चित्रपट असो अथवा एखादी मालिका असो ‘टाईम-टू-टाईम’ त्या पाहणाऱ्यांची संख्या अधिक आहे़ विशेषत: उस्मानाबाद जिल्ह्यातील शहरांमध्ये मनोरंजनाची इतर साधने कमी असल्याने गृहिनींना, बालकांना मनोरंजनासाठी ‘टीव्ही’शिवाय पर्याय राहिलेला नाही़ केंद्र, राज्य शासनाने ‘डिजिटल इंडिया’ ही संंकल्पना सत्यात उतरविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यास सुरूवात केले आहेत़ याचाच एक भाग म्हणून माहिती व प्रसारण मंत्रालयाने केबल सेवेचे ‘डिजीटायझेशन’ करण्याचे आदेश दिले आहेत़ या सेवेची अंमलबजावणी करण्यासाठी करमणूक विभागाने कामकाज सुरू केले आहे़ त्यामुळे नव्या वर्षापूर्वी ‘सेट टॉप बॉक्स’ न बसविलेल्या शहरी ग्राहकांच्या ‘टीव्ही’ सध्या केवळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत़ त्यातच केबलचालकांनी ‘सेट टॉप बॉक्स’साठी वेटींग लिस्टच तयार केल्याने अनेकांना आपला नंबर केव्हा येणार ? याचीच चिंता लागली आहे़ जिल्ह्यातील आठ नगर पालिकेच्या हद्दीसह ग्रामीण भागात एकूण ८२ केबलचालक आहेत़ तर या केबल चालकांकडे केवळ ३० हजार ग्राहक असल्याचे प्रशासनाला कळविण्यात आले आहे़ केबल चालकांना ग्रामीण एका ग्रामीण भागातील १५ रूपये तर शहरी भागातील ग्राहकांसाठी ३० रूपये कर शासनाला भरावा लागतो़ तसे पाहता केबल चालकांचे जिल्ह्यात मोठे जाळे निर्माण झाले आहे़ मुलांना कामावर ठेवून त्यांच्याकडून ग्राहकांकडील बिले महिन्याकाठी वसूल करण्यात येतात़ सरकारी ग्राहकांची संख्या पाहता केबल चालकांकडील ग्राहकांची संख्या निश्चित मोठी आहे़ त्यामुळे ३१ डिसेंबर पर्यंत ‘सेट टॉप बॉक्स’न बसविलेल्या ग्राहकांची मोठी अडचण झाली आहे़ ‘सेट टॉप बॉक्स’चा विषय समोर आल्यानंतर अनेकांनी ‘डीश’ला पसंती दिली. मात्र, विविध कंपन्यांच्या ‘डिश’च्या किंमती, मासिक पॅकेजचा ताळमेळ लावण्यात ग्राहकांचा गोंधळ होत आहे़लोहाऱ्यात ४६३ ग्राहकलोहारा येथे दोन केबलचालक असून, त्यांच्याकडे ४६३ ग्राहक आहेत़ एकाकडे ३०७ तर दुसऱ्याकडे १५६ ग्राहक असल्याची नोंद आहे़ मात्र सेवेमध्ये त्रुटी असल्याच्या तक्रारी ग्राहकांतून होत आहेत़ ग्राहक सतीश गिरी यांनी सेवा सुरळीत द्यावी, मासिक दर कमी करावेत, अशी मागणी केली. तर केबलचालक आऱ बी़ गिराम यांनी ‘सेट टॉप बॉक्स’ बसविण्याबाबत प्रशासनाकडून सूचना आलेल्या नसल्याचे सांगितले़कळंब : शहरातील जवळपास २५०० केबल ग्राहकांचे टीव्ही ‘सेट टॉप बॉक्स’ अभावी बंद पडले असून, ‘सेट टॉप बॉक्स’ही वेळेत मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे़ शासनाचा फतवा, प्रशासनाची कारवाई आणि केबलचालकांच्या समस्या यामुळे ग्राहकांच्या मनोरंजनावर ‘संक्रांत’ आली आहे़कळंब शहरात एकमेव केबलचालक आहे़ या केबल चालकाकडून जवळपास ८० चॅनल दाखविण्यात येतात़ तर ग्राहकांची संख्या ३००० च्या जवळपास आहे़ शासनाने ‘सेट टॉप बॉक्स’ बसविण्यासाठी ३१ डिसेंबर ही मुदत दिली होती़ जवळपास ५०० जणांनी ‘सेट टॉप बॉक्स’ बसविला आहे़ उर्वरित ग्राहकांना ‘सेट टॉप बॉक्स’ पुरविण्यासाठी कंपनीकडे चालकांकडून पाठपुरावा करण्यात येत आहे़ मात्र, त्यांना वेळेत ‘सेट टॉप बॉक्स’ मिळत नसल्याने अनेकांचे टीव्ही बंद पडले आहेत़ ३१ डिसेंबरची मुदत संपल्यानंतर शहरातील ‘सेट टॉप बॉक्स’अभावी असलेली केबलसेवा सीलबंद करण्यात आली आहे़ ही कारवाई तहसीलदार सुरेंद्र देशमुख, नायब तहसीलदर प्रविण लटके यांनी केली़ दरम्यान, कळंब शहरात अॅनालॉग पध्दतीने केबल सेवा देणाऱ्या चालकाने ‘सेट टॉप बॉक्स’साठी एका कंपनीकडे जवळपास लाखो रूपये आगावू भरले होते़ तरीही ‘सेट टॉप बॉक्स’ मिळत नसल्याचे वृत्त आहे़ शिवाय ‘सेट टॉप बॉक्स’ सेवा देण्यासाठी बाँडविडथ कनेक्टिव्हिटीची आवश्यकता आहे़ ही कनेक्टिव्हीटी इंटरनेट सेवाही संबंधित कंपनीकडून मिळत नसल्याचे दिसून येत आहे़ परिणामी ग्राहकांना मात्र गैरसोयीचा सामना करावा लागत आहे़याबाबत उस्मानाबाद येथील केबलचे व्यवस्थापक मनोज केजकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, शहरात साधारणत: ४५०० ग्राहक आहेत़ आजवर जवळपास ९०० जणांनी ‘सेट टॉप बॉक्स’ बसविला आहे़ ३१ डिसेंबर पूर्वी सेट टॉप बॉक्स बसविले नसल्याने अनेकांचे टीव्ही बंद पडले आहेत़ ग्राहकांना ‘सेट टॉप बॉक्स’ बसविण्यासाठी कंपनीकडे सतत पाठपुरावा सुरू आहे़ ‘सेट टॉप बॉक्स’ उपलब्ध झाल्यानंतर ग्राहकांना पुरविण्यात येणार आहेत़
मनोरंजनात ‘सेट टॉप बॉक्स’चा व्यत्यय
By admin | Updated: January 4, 2016 00:01 IST