वाळूज महानगर : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे राज्यस्तरीय अधिवेशन पुणे येथे २७ जुलै रोजी होणार आहे.नुकतेच राज्य शासनाने राज्यातील जवळपास २८ हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान तसेच नियमितपणे वेतन मिळत असल्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. गावात कित्येक वर्षांपासून सेवा करूनही पदाधिकाऱ्यांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे कर्मचाऱ्यांना कायम बेरोजगार होण्याची चिंता असते. ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीनंतर सत्ता बदल झाल्यास कर्मचाऱ्यांना वेठीस धरून पदाधिकारी त्यांना छळतात. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नोकरीत स्थैर्य मिळावे तसेच त्यांचे प्रलंबित प्रश्न निकाली निघण्यासाठी संघटना शासनाकडे पाठपुरावा करीत आहे. २७ जुलै रोजी दुर्वाकार लॉन्स मंगल कार्यालयात (भोसरी, पुणे) हे अधिवेशन होईल. अधिवेशनाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनात राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन वेतनश्रेणी देण्यात यावी, आकृतीबंधाची अट रद्द करून सर्व कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीची रक्कम, दरमहा पेन्शन तसेच शासकीय कर्मचाऱ्यांसाठी लागू असलेल्या विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठी मुख्यमंत्री व ग्रामविकासमंत्र्यांशी संघटनेचे पदाधिकारी चर्चा करणार आहेत. अधिवेशनाला औरंगाबाद जिल्ह्यातून जवळपास ५०० ग्रामपंचायत कर्मचारी जाणार असल्याचे संघटनेचे राज्य उपाध्यक्ष गणेश गायके, जिल्हाध्यक्ष अशोक पाटेकर, जिल्हा उपाध्यक्ष ताजू मुल्ला यांनी कळविले आहे.
ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे २७ जुलैला पुणे येथे अधिवेशन
By admin | Updated: July 22, 2014 00:36 IST