हिंगोली : सप्टेंबर महिना संपण्याच्या मार्गावर असताना पावसाचा पत्ता नाही. मोजून २७ पैकी ५ दिवसच पाऊस झाल्याने पिके अंतिम टप्प्यात पोहोचली. गतवर्षीपेक्षाही वाईट स्थिती असताना कृषी विभागाला काही सोयरसुतक राहिले नाही. आता पुढे पावसाची शक्यता असल्याने शेतकरी घायकुतीला आला. प्रशासन निवडणुकीच्या कामांत गुंतले असल्याने बळीराजास कोणी वाली राहिला नसल्याचे चित्र आहे. मान्सूनच्या आगमनापासून पावसात अनियमितता आणि अनिश्चितता आहे. आॅगस्ट महिनाही कोरडा जाण्याची मार्गावर असताना शेवटी पाऊस झाला. सप्टेंबरचे पहिले दोन दिवसनंतर ७ आणि ८ रोजी आठवडाभर पाऊस झाला. तेव्हापासून शनिवारपर्यंत पावसाने नाव घेतलेले नाही. घटस्थापनेपर्यंत शेतकऱ्यांना अपेक्षा होती. नवरात्रोत्सवाला आत तीन दिवस लोटले. तरीही पावसाचा थेंबही पडला नाही. परिणामी, जिल्ह्यात दयनिय स्थिती निर्माण झाली. बहुतांश ठिकाणी पिके वाळून गेली. अनेकांनी तर ही पिके रानाबाहेर काढली. यापूर्वीच्या सततच्या पावसामुळे रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने फवारणी वाढली. खर्च दुपटीवर गेला. दरम्यान, मान्सून परतीचा कालावधी संपत आला. तरीही जिल्ह्यात ५० टक्केच पाऊस झाला. त्यातही खंड पडला. औंढा आणि सेनगाव वगळता तिन्हीही तालुक्याला ५०० मिमीचा आकडा गाठता आलेला नाही. सर्वच पिके अंतिम घटका मोजत असताना कृषी अधिकारी कार्यालयाबाहेर निघत नाहीत. यापुढे पाऊस पडेल की नाही, याची शाश्वती राहिली नाही.कृषी विभागाने आता लक्ष दिले नाही तर शेतकरी मोडून पडण्याची भीती निर्माण झाली आहे. वाढणाऱ्या पिकांवर काही उपाय नसला तरी किडीच्या प्रादुर्भावाने संकटात सापडलेली पिकी तरी वाचविता येईल. मात्र कृषी विभागाला त्यासाठी वेळ मिळायला पाहिजे. (प्रतिनिधी)
सप्टेंबर महिना कोरडा; उभी पिके करपू लागली
By admin | Updated: September 27, 2014 23:18 IST