औरंगाबाद : महापौर-उपमहापौर निवडणुकीसाठी मागील काही दिवसांपासून सेनेकडून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. महापौरपदाचा राजीनामा देण्यासाठी दररोज एक नवीन कारण शोधून काढण्यात येत आहे. राज्यात भाजपची सत्ता असतानाही एक महापौरपद मिळविण्यासाठी भाजपला सेनेसमोर अत्यंत बोटचेपे धोरण स्वीकारावे लागत आहे. सोमवारी रात्री उशिरा युतीच्या स्थानिक नेत्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीत सेना नेत्यांनी १२ नोव्हेंबरनंतर उद्धव ठाकरे विदेश दौऱ्यावरून आल्यानंतर राजीनाम्यावर निर्णय होईल, असे भाजपला सांगण्यात आले. हा निर्णयही भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मौन बाळगून मान्य केला.दीड वर्षापूर्वी शिवसेना-भाजप युतीमध्ये जागा वाटपाचा करार झाला होता. या करारानुसार सुरुवातीचे १५ महिने सेनेचा महापौर आणि भाजपचा उपमहापौर होईल. उर्वरित १२ महिने भाजपचा महापौर तर सेनेचा उपमहापौर असाही निर्णय झाला. ३१ आॅक्टोबर रोजी सेनेचे महापौर त्र्यंबक तुपे, भाजपचे उपमहापौर प्रमोद राठोड यांचा कार्यकाळ संपला. अगोदर दिवाळीनंतर राजीनामा देण्याचे सेनेने जाहीर केले. दिवाळी संपल्यावर ५ नोव्हेंबर रोजी सेनेचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर शहरात येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत अंतिम निर्णय होईल. घोसाळकर ७ नोव्हेंबरला शहरात आले. रात्री उशिरा बैठकीत घोसाळकर यांनी सांगितले की, १२ नोव्हेंबरनंतर उद्धव ठाकरे विदेश दौऱ्याहून येणार आहेत. त्यानंतर निर्णय होणार आहे. भाजपने राजीनामा देणार किंवा नाही असे विचारले. सेनेनेही राजीनामा देणार; पण निर्णय पक्षप्रमुख घेणार असल्याचे सांगण्यात आले.
सेनेने दाखविला भाजपला ठेंगा!
By admin | Updated: November 9, 2016 01:35 IST