नांदेड : येथील नाना - नानी पार्क येथे ज्येष्ठ नागरिक भवन उभारण्याचे काम अंतिम टप्यात असून दीड, दोन महिन्यात बांधकाम पूर्ण होताच बांधून तयार झालेली नवीन इमारत ज्येष्ठ नागरिक संघाच्या स्वाधीन करण्यात येईल, अशी माहिती मनपाचे आयुक्त जी़ श्रीकांत यांनी दिली़ यासंदर्भात मनपाचे उपअभियंता दिलीप टाकळीकर यांनी ज्येष्ठ नागरिक संघाच्या प्रतिनिधींना माहिती देताना सांगितले, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री डी़ पी़ सावंत यांनी ज्येष्ठ नागरिक भवन बांधकामासाठी ४० लाखाची मान्यता दिली़ प्रत्यक्षात ४६ लाख २८ हजार २२९ रूपयांचे अंदाज पत्रक तयार करण्यात आले होते़ बांधकाम क्षेत्र ६२ बाय ३७ फुटाचे असून जमीनस्तरावर बांधकाम आहे़ यामध्ये एक प्रशस्त हॉल, दोन खोल्या, किचन रूम, स्वच्छतागृह व पायऱ्या बांधण्यात येणार आहेत़ या कामासाठी १८ लाख खर्च झालेला असून येत्या दिपावली पूर्वी इमारत बांधकाम पूर्ण होईल, असेही टाकळीकर म्हणाले़ ३ मार्च २०१४ पासून या बांधकामाला सुरूवात झाली आहे़ या कामासाठी काही मान्यवर मंडळीनी जून २०१३ मध्ये स्वेच्छानुसार काही देणग्या जाहीर केल्या आहेत़ या निधीचा उपयोग या कामासाठी होणार आहे़ दरम्यान, ज्येष्ठ नगारिक भवनच्या बांधकामाची पाहणी करण्यासाठी महासंघाचे अध्यक्ष डी़ के़ पाटील, सुभाषाराव बाऱ्हाळे, नृसिंह दांडगे, अशोक तेरकर, मनोहर सोनुले यांनी भेट दिली़ (प्रतिनिधी)
ज्येष्ठ नागरिक भवनाचे काम अंतिम टप्यात
By admin | Updated: July 8, 2014 00:34 IST