औरंगाबाद : भाजपाने समांतर जलवाहिनीच्या योजनेवरून सुरू केलेल्या राजकारणामुळे शिवसेनेचे पाणी-पाणी झाले आहे. त्या योजनेच्या कराराची चिरफाड होण्याच्या भीतीमुळे मनात नसतानाही महापौर कला ओझा यांनी अखेर १३ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वा. विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केल्याचे वृत्त हाती आले आहे. विशेष म्हणजे या सभेसाठी शिवसेना व स्थायी समिती सदस्यांच्या पत्रावरून सभा न घेता भाजपा सदस्यांनी दिलेल्या सभेच्या मागणी पत्रावरून शिवसेनेने हा ‘विशेष’ निर्णय घेतला आहे. मनपा निवडणुकीच्या तोंडावर त्या योजनेचे काम घेतलेल्या कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे आणि मनपाच्या हातवरच्या करण्याच्या भूमिकेमुळे जनतेत तीव्र असंतोष निर्माण होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे भाजपाने तो असंतोष राजकीय श्रेयात परिवर्तित करण्यास सुरुवात केल्याने शिवसेनेने भाजपाच्या मागणीनुसार सभा घेण्यासाठी पाऊल उचलल्याने सेनेने एक प्रकारे नांग्या टाकल्या आहेत. भाजपाच्या सदस्यांनी मागणी केल्यानंतर समांतर जलवाहिनीच्या योजनेसाठी विशेष सभेचे आयोजन केले आहे. परिणामी शिवसेना सदस्यांमध्ये व सभापती विजय वाघचौरे यांच्या नाराजीचा सूर उमटला आहे. स्थायी समिती सदस्यांच्या मागणीनुसार सभा झाली असती तर पक्षाला फायदा झाला असता, असे सेनेच्या सदस्यांना व जैस्वाल यांना वाटत होते; परंतु सेनेतील काही हेकेखोर नेत्यांना ती सभा होऊच नये असे वाटत होते. भाजपाच्या पत्रासमोर आता सेनेतील समांतरपे्रमी गटाने नांग्या टाकल्या असल्या तरी अजूनही त्यांनी ती सभा होऊ नये असे त्यांना वाटते आहे.
भाजपामुळे सेनेचे पाणी-पाणी
By admin | Updated: January 7, 2015 01:04 IST