जालना: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महामार्गावरील बियरबार, वाईन शॉप, बार रेस्टारंट शनिवारी बंद करण्यात आले. ही दुकाने बंद असले तरी काही दुकानातून चोरी छुपे दारू विक्री होत असल्याचे चित्र आहे. ढाबे चालकांनी अवैध मार्गाने दारू विक्री करणे सुरू केली आहे. जिल्ह्यातील ३५० दुकानांपैकी २३९ दारू दुकने बंंद करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील २ वाईनबार, ४२ देशी दारूचे दुकाने, ३८ बिअर शॉपी आणि १५८ परमिट रूमचा समावेश आहे. उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी कारवाई करीत वरील ठिकाणी दारू विक्री बंद केली असली तरी काहींनी पुन्हा जवळच्या दुकानांतून अथवा ढाब्यावर विक्री सुरू केली आहे. ज्यांची दुकाने बंद झाली आहेत त्यांनी ढाबे चालकांशी संधान साधून कमिशन तत्वावर दारू विक्री सुरू केली आहे. सध्या तरी ठराविक ग्राहकांनाच ढाबेचालक दारू देत आहेत. त्यामुळे बार किंवा रेस्टारंट बंद झाले तरी काहींनी यातून पळवाट काढून दारू विक्री सुरूच ठेवल्याचे चित्र आहे. जालना शहर परिसरातून जाणाऱ्या चार राज्य मार्गावर असंख्य ढाबे तसेच लहान - मोठी उपहारगृहे आहेत. येथे अवैध दारूचे साठे तसेच छुप्या मार्गाने दरू विक्री सुरू असल्याची माहिती आहे. या दारू विक्री विक्रीतून ढाबेवाल्यांची चांदी होत आहे. बहुतांश ढाब्याच्या मागील बाजूस अथवा पानटपऱ्यांमध्ये अवैध दारूचा साठा करून ठेवला जात आहे. ढाबे तसेच अन्य ठिकाणी चोरी छुपे मार्गाने होणाऱ्या ठिकाणी उत्पादन शुल्क विभाग कधी कारवाई करणार याची प्रतीक्षा आहे. (प्रतिनिधी)
ढाब्यांवर होतेय छुप्या पद्धतीने दारू विक्री
By admin | Updated: April 2, 2017 23:51 IST