जालना : सर्वशिक्षा अभियानच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत गुणवत्ता वाढीसाठी २०१५-१६ या वर्षासाठी जिल्ह्यातील २०० शाळांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठीची आर्थिक तरतूद भारत सरकारच्या प्रकल्प मान्यता मंडळाने मंजूर केल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी अशोक राऊत यांनी दिली.या उपक्रमाअंतर्गत शाळांच्या निवडीसाठी काही निकष ठरवून देण्यात आले आहेत. प्रत्येक समूह साधन केंद्रातून एक शाळा याप्रमाणे २०० शाळांची निवड करण्यात येणार आहे. जिल्ह्यात शाळेचे व्यवस्थापन जिल्हा परिषद, नगर परिषदांकडे असणार आहे. शाळा निवडीसाठी आवश्यक बाबींची माहिती विस्तृतपणे नमूद करण्यात आली आहे. त्यानुसार तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील व समूह साधन केंद्रावर केंद्रप्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती स्थापन करावयाची आहे. समूह साधन केंद्राअंतर्गत सर्व शिक्षकांची बैठक व नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सादरीकरण व निवड २ मे रोजी होणार आहे. गटसाधन केंद्रावर निवडलेल्या उपक्रमाच्या सादरीकरणासाठी ६ मे रोजी बैठक बोलावण्यात येणार आहे. जिल्हा कार्यालयास प्रत्येक केंद्रातून दोन याप्रमाणे एकूण २१२ शाळांची यादी व सादरीकरण प्रत गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत सादर करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
गुणवत्ता वाढीसाठी करणार २०० शाळांची निवड
By admin | Updated: April 29, 2015 00:52 IST