लोकमत न्यूज नेटवर्कराजूर : राजूर येथील गणपती संस्थानच्या जागेवर असलेल्या थकबाकीदार तेरा दुकानांना बुधवारी पोलीस बंदोबस्तात संस्थानच्या अध्यक्षा तथा तहसीलदार योगिता कोल्हे यांनी सील ठोकून धडक कारवाई केली. विशेष म्हणजे सील ठोकलेल्या दुकानदारांत एका पदसिध्द विश्वस्ताचा समावेश आहे. संस्थानने राबवलेल्या धडक मोहिमेमुळे गाळेधारकांत एकच खळबळ उडाली होती.राजूर येथील गणपती संस्थानच्या जागेवर सुमारे शंभर दुकाने आहेत. यामधे विविध व्यावसायिकांचा समावेश आहे. काही दुकानदारांकडे गेल्या सहा महिन्यापासून ते दोन वर्षापर्यंत भाडे थकीत होते.दोन दिवसांपूर्वी संस्थानने थकबाकीदारांना नोटीस देऊन भाडे भरा अथवा दुकानांना सील ठोकण्यात येईल, असा इशारा दिला होता. तरीही थकबाकीदारांनी भरणा केला नाही. त्यामुळे तहसीलदार तथा संस्थानच्या अध्यक्षा योगिता कोल्हे यांनी बंदोबस्तात सील ठोकण्याची मोहीम हाती घेतली. यामध्ये दत्तात्रय कुमकर, जिजाबाई पुंगळे, शेषराव बोर्डे, आर.एस.पळसकर, मंगेश जाधव, शेख मुसा शेख रहेमान, शेख नसीर शेख करीम, विष्णू तायडे, भगवान जाधव, मोहिनीराज मापारी, महंमदखॉ पठाण, अशोक गवळी, बबन कळसकर यांच्या दुकानांना सील करण्यात आले.मोहिमेत कोल्हे यांच्यासह मंडळ अधिकारी एस.डी.ठोंबरे, तलाठी अविनाश देवकर, कार्यालयीन अधीक्षक प्रशांत दानवे, व्यवस्थापक गणेशराव साबळे, बाळा तांगडे, देशपांडे, कांता डवले, संजय टेपले यांचा सहभाग होता.
संस्थानच्या जागेवरील तेरा गाळ्यांना सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:57 IST