व्यंकटेश वैष्णव बीडजिल्ह्यातील बहुतेक सोनोग्राफी सेंटर्सकडे मातेचे संमतीपत्र, डॉक्टर डिक्लरेशन आदी बाबी नसतानाही गरोदर मातेची सोनोग्राफी होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. मागील तीन महिन्यात सेंटर्सची तपासणी झालेली नाही. यावरून गुरूवारी जिल्हा शल्य चिकित्सकांनी जिल्ह्यातील वैद्यकीय अधीक्षकांना सोनोग्राफी सेंटर्सच्या तपासणीबाबत खडसावले असल्याचे सूत्रांनी सांगितले.बीड जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. बेटी बचाओ-बेटी पढाओ यासारखे अनेक कार्यक्रम राबवत आहे. याशिवाय, मदर-चाईल्ड ट्रेसिंग नंबर यासह विविध उपक्रम राबविले जात आहेत. असे असताना सोनोग्राफी सेंटर्सच्या तपासणीकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्यात ११९ च्या जवळपास सोनोग्राफी सेंटर्स आहेत. या सेंटर्सची तपासणी जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अधिपत्याखाली प्रत्येक तीन महिन्याला होणे अपेक्षित आहे. मात्र, या तपासणीकरिता दुर्लक्ष केले जात असल्याने पुन्हा ‘पहिले पाढे पंचावन्न’ अशी स्थिती स्त्री भ्रूण हत्येबाबत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.कागदोपत्री तपासण्या करण्याचे प्रकार देखील जिल्ह्यातील काही तालुक्यात होत आहेत. अनेक सोनोग्राफी सेंटर्सकडे रेकॉर्ड अद्ययावत नाही. असे असतानाही कारवाई होत नाही. ११९ सोनोग्राफी सेंटर्स चालकांनी डॉक्टर डिक्लरेशन, वेळेवर एफ फॉर्म भरणे, मातेचे संमतीपत्र यासह आवश्यक ती माहिती अद्यावत ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, प्रत्यक्षात याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची वस्तुस्थिती आहे.काय म्हटले पत्रातजिल्हा शल्य चिकित्सकांनी वैद्यकीय अधीक्षक तथा तालुका समुचित प्राधिकारी उप जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय यांना काढलेल्या पत्रात म्हटले आहे की, जुलै ते सप्टेंबर २०१६ या दुसऱ्या तिमाहीत जिल्हाभरात सोनोग्राफी केंद्रांची तपासणी न झाल्याने ही बाब अतिशय गंभीर आहे. सोनोग्राफी सेंटर्सना घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित सेंटर्सच्या विरोधात न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात येईल, अशी तंबी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश चव्हाण यांनी वैद्यकीय अधीक्षकांना पत्राद्वारे तंबी दिली आहे.
सोनोग्राफी सेंटर्सच्या रखडल्या तपासण्या
By admin | Updated: December 22, 2016 23:17 IST