लातूर : लातूर शहरात मनपाने डेंग्युसदृश आजाराचे प्रमाण रोखण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत़ त्याचअनुषंगाने शहरातील शाळा मुख्याध्यापकांची बैठक घेऊन मनपा प्रशासनाने स्वच्छतेसंदर्भात घ्यावयाची काळजी, याविषयी मार्गदर्शन केले आहे़ शिवाय, विद्यार्थ्यांच्या पोषाखासंदर्भातही सूचना करण्यात आल्या आहेत़ लातूर शहरातील भालचंद्र ब्लड बँकेच्या सभागृहात झालेल्या बैठकीस मनपा आयुक्त सुधाकर तेलंग, सहाय्यक आयुक्त वसुधा फड, मनपाचे शिक्षणाधिकारी सोनफुले, आरोग्यअधिकारी डॉ़ महेश पाटील, डॉ़ महेश सोन्नार, सुपर्ण जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती़ डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली़ डेंग्युचा डास दिवसा चावतो़ या आजाराचे प्रमाण ० ते १५ या वयोगटात सर्वाधिक आढळून येत असल्याने शालेय विद्यार्थ्यांची विशेष काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत़ शाळेच्या खिडक्यांना जाळी बसविणे, कुंड्या, जुनाट पाणीसाठे याविषयी मार्गदर्शन झाले़ बैठकीस मनपा शाळेच्या मुख्याध्यापकासह खाजगी शाळेतील जवळपास १२५ मुख्याध्यापकांची उपस्थिती होती़
डेंग्यू रोखण्यासाठी शाळा सरसावल्या
By admin | Updated: November 12, 2014 00:25 IST