उस्मानाबाद : पाचवी आणि आठवीचे वर्ग नसणार्या जिल्हा परिषद आणि नगर परिषद शाळांमध्ये आवश्यक त्या ठिकाणी हे वर्ग सुरु केले जाणार आहेत. मात्र यामध्ये बोगसगिरी होवू नये, यासाठी शाळांमधील अंतर ‘गुगल सर्च’ द्वारे तपासण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेच्या वतीने प्राथमिक आणि माध्यमिक अशा १ हजार ९३ शाळा चालविल्या जात आहेत. मात्र मागील काही वर्षापासून ग्रामीण भागातही खाजगी इंग्रजी शाळांचे जाळे झपाट्याने विस्तारु लागले आहे. याचा फटका जिल्हा परिषद व नगर परिषद शाळांना बसत आहे. त्यामुळेच की काय वर्षागणिक शिक्षक मोठ्या संख्येने अतिरिक्त होत आहेत. सध्या जिल्हाभरातून शेकडो शिक्षक अतिरिक्त झाले आहे. त्यांच्या समायोजनांचा प्रश्न गंभीर बनला आहे. यातून तोडगा काढण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता १ कि.मी. परिसरातील पाचवीपर्यंत शाळा नसेल तर चौथीपर्यंतच्या शाळेला पाचवीचा वर्ग जोडला जाणार आहे. तर ३ कि.मी. परिसरात ८ वी पर्यंत शाळा नसेल तर अशा ठिकाणी सातवी पर्यंतच्या शाळेला ८ वी चा वर्ग जोडला जाणार आहे. दरम्यान, ही प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शी व्हावी, यासाठी ‘गुगल सर्च’ च्या माध्यमातून स्कूल मॅपींग (शाळांतील अंतर तपासून) करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या माध्यमातून जिल्हाभरात किती शाळांमध्ये पाचवी व आठवीचे वर्ग सुरु होऊ शकतात हे समोर येईल. ‘एमआरएचएसी’ सॉफ्टवेअर स्कूल मॅपींग करण्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने एमआरएचएसी हे सॉफ्टवेअर निर्माण करण्यात आले आहे. सदर सॉफ्टवेअर एन्ड्रॉईड मोबाईलवर उपलब्ध करुन दिले जाणार आहे. त्यामुळे दोन शाळातील अंतर किती आहे, हे समोर येण्यास मदत होईल. केंद्रप्रमुख, विस्तार अधिकार्यांची मदत स्कूल मॅपींगसाठी केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यांची मदत घेतली जाणार आहे. स्कूल मॅपींगच्या प्रत्यक्ष कामास सोमवारपासून प्रारंभ होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यात आजपासून ‘स्कूल मॅपिंग’
By admin | Updated: May 19, 2014 01:04 IST