जालना : शाळेतील पदवीधर शिक्षकाचे पद गेल्या तीन महिन्यांपासून रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ग्रामस्थांनी थेट जिल्हा परिषद येथे येऊन सीईओंच्या दालनासमोर शाळा भरविली. परंतु सीईओ दीपक चौधरीसह अधिकारी पदाधिकारी हे जि.प. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कार्याशाळेत असल्याचे समजताच ग्रामस्थांसह १०० विद्यार्थ्यांनी थेट मेळाव्याच्या ठिकाणी जाऊन पालकमंत्र्यासमोर आपली व्यथा मांडली. शाळेला शिक्षक देण्याची मागणी करत मेळाव्यातच शाळा भरविल्याने सीईओंसह शिक्षणधिकाऱ्यांची धांदल उडाली.भोकरदन तालुक्यातील बोरगाव तारू येथे १ ते ८ पर्यंतच्या तुकड्या आहेत. शाळेला एकून पाच पदे मंजूर आहेत. त्यापैकी चार शिक्षक कार्यरत आहेत. परंतु त्यापैकी पदवीधर शिक्षकांचे एक पद रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे ग्रामस्थांसह पालकवर्गाचे म्हणणे आहे. चार शिक्षक जरी कार्यरत असले तरी दोन शिक्षक कायम कार्यालयीन कामात व्यक्त असल्याने फक्त दोनच शिक्षक विद्यार्थ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून शिकवित आहेत. विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ग्रामस्थांनी रिक्त पद भरण्याची मागणी शिक्षण विभागाला अनेक वेळा केली होती. ८ जुलै रोजी ग्रामस्थांनी शाळेला कुलूप सुध्दा लावले होते. परंतु शिक्षक देण्याचे फक्त अश्वासन ग्रामस्थांना देण्यात आले.दरम्यान, सीईओंसह सर्वच अधिकारी, कर्मचारी मेळाव्यात गेल्याचे कळताच ग्रामस्थांनी मेळाव्यात जाऊन शिक्षक देण्यासाठी घोषणाबाजी केली. त्यामुळे पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी शिवाजीराव जोधंळे , सीईओ दीपक चौधरी, अतिरीक्त उप मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी आवाक् झाले. ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांच्या घोषणाबाजीमुळे मेळाव्यातील सुरू असलेले मान्यवरांचे भाषणे काही काळ थांबविण्यात आले. पालकमंत्री लोणीकर यांच्याकडे ग्रामस्थांनी कैफियत मांडल्याने शिक्षणाधिकारी पांडुरंग कवाणे यांना मेळावा अर्धवट सोडून जिल्हा परिषदेत यावे लागले. शिक्षक देण्याच्या आश्वासनाचे पत्र हाती पडल्यानंतर ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी मेळाव्याचे ठिकाण सोडले. (प्रतिनिधी)
कार्यशाळेत भरविली बोरगाव तारूची शाळा
By admin | Updated: August 20, 2016 00:48 IST