भोकरदन : जंगलातून पाण्याच्या शोधात भोकरदन शहराच्या परिसरात आलेल्या निल गायीला सोमवारी रात्री अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे गंभीर जखमी झाली होती. मात्र, गायीवर वेळेत उपचार न झाल्यामुळे मंगळवारी सकाळी दहा वाजता गायीने प्राण सोडला.या घटनेची माहिती वनविभागाला सकाळी ६ वाजता दिल्यानंतरही या विभागाचे कर्मचारी निलगायीचा प्राण गेल्यावर घटनास्थळी दाखल झाल्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे़धावडा, परिसरामध्ये निलगायीची संख्या मोठी आहे. सोमवारी रात्री या गायीच्या कळपातून एक निलगाय पाण्याच्या शोधात भरकटली व भोकरदन परिसरात आली ही गाय भोकरदन - सिल्लोड रोडवरीलएका पेट्रोल पंपासमोर आली असता अज्ञात वाहनाने या गायीला धडक दिली जबर जखमी झाली. गाय रस्त्याच्या बाजूला जखमी अवस्थेत पडलेली होती मंगळवारी सकाळी शिवसेना शहर प्रमुख महेश पुरोहित, रणजित देशमुख, गणेश इंगळे हे रपेटसाठी जात असताना त्याना ही गाय दिसली. त्यानी तात्काळ सदर घटना वनविभागाच्या अधिकाऱ्याना कळविली. या गायीवर उपचार करणे अंत्यत गरजेचे आहे असे सांगूनही सकाळी दहा वाजेपर्यंत कोणीच आले नाही. वनविभाग व पशुधन दवाखान्याचा एकही डॉक्टर या ठिकाणी आला नाही. त्यामुळे १० वाजता या गायीने प्राण सोडला त्यानंतर मात्र वनविभागाचे कर्मचारी व पशुधन विभागाचे डॉक्टर या ठिकाणी आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वेळेत उपचार केले असते तर या वन्य प्राण्याचा जीव वाचला असता. मात्र दोन्ही विभागातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे गायीचे प्राण वाचू शकले नाहीत. (वार्ताहर)
वनविभागाचे कर्मचारी निल गायीचे प्राण गेल्यावर आले घटनास्थळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2017 23:54 IST