औरंगाबाद : माजी केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री जयवंतीबेन मेहता (कापडिया) यांना सोमवारी सायंकाळी ५ वा. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या मुख्य सभागृहात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दिनकर बोरीकर, डॉ. नवनीतभाई श्रॉफ, डॉ. साधना शहा, मयुराबेन पटेल, शैलेश शहा, सुवर्णा पांडे, शैलेश पटेल, नानाभाई पारीख यांची उपस्थिती होती. मेहता यांचे सोमवारी दुपारी मुंबईत निधन झाले. श्रद्धांजली अर्पण करताना बोरीकर म्हणाले, जयवंतीबेन यांच्या जाण्यामुळे एका ध्यासपर्वाला देश मुकला आहे. प्रत्येक कार्य धडाडीने करण्याची त्यांची जिद्द वाखाणण्याजोगी होती. डॉ.नवनीतभाई श्रॉफ यांनी त्यांच्या बाबतच्या अनेक आठवणी याप्रसंगी सांगितल्या. डॉ. साधना शहा यांनी जयवंतीबेन यांच्याबाबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. बालपण, गुजराती पाठशाळा, शारदा मंदिरमधील शिक्षण व त्यानंतर मुंबई आणि राजकीय कारकीर्दीवर डॉ.शहा यांनी प्रकाश टाकला. गुजराती कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मयुराबेन पटेल यांनी शाळेला मिळालेल्या वर्गखोल्या या जयवंतीबेन यांच्या या शहराबद्दल असलेल्या आपुलकीमुळे मिळाल्याचे नमूद केले. याप्रसंगी शाळेच्या पर्यवेक्षिका सुवर्णा पांडे, शैलेश शाह, शैलेश पटेल यांनी जयवंतीबेन यांना श्रद्धांजली अर्पण केली.
स.भु. शिक्षण संस्थेत जयवंतीबेन यांना श्रद्धांजली
By admin | Updated: November 8, 2016 01:27 IST