दैठणा : पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला तरी पाऊस झाला नसल्याने शेतकरी त्रस्त असून शनिवारी येथील गावकऱ्यांनी दहा कि.मी. पायीदिंडी काढून देवाला पावसाचे साकडे घातले. जिल्हाभरात पावसाने पाठ फिरविली आहे. अजूनही पेरणी योग्य पाऊस झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट पडले आहे. पावसासाठी नागरिक वेगवेगळ्या मार्गाने देवाची आराधना करीत आहेत. १९ जुलै रोजी दैठणा येथील नागरिकांनी १० कि.मी. अंतरावरील खळी येथे जाऊन गोदावरी नदीचे पाणी पायी दिंडीने गावात आणले. दैेठणा येथील हनुमान मंदिरात गंगेच्या पाण्याने देवाला जलाभिषेक करण्यात आला. याचवेळी पाऊस पडावा, असे साकडेही घालण्यात आले. ४०० ते ५०० नागरिक या पायी दिंडीत डोक्यावर घागर घेऊन सहभागी झाले होते. (वार्ताहर)
पावसासाठी देवाला घातले साकडे
By admin | Updated: July 20, 2014 00:36 IST