खुलताबाद / छत्रपती संभाजीनगर : शहरातून म्हैसमाळ व वेरूळ येथे मित्रांसोबत फिरण्यासाठी गेलेल्या युवकाचा जाेगेश्वरी धबधब्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. हर्षदीप नाथा तांगडे (२१, रा. नागसेननगर, उस्मानपुरा) असे मृताचे नाव आहे.
नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार उस्मानपुरा भागातील नागसेननगर येथील हर्षदीप १३ मित्रांसोबत रविवारच्या सुटीमुळे म्हैसमाळ, वेरूळला फिरण्यासाठी गेला होता. म्हैसमाळनंतर दुपारी हे सर्व मित्र वेरूळ लेणी धबधब्याच्या वर असलेल्या डोंगरातील येळगंगा नदीवरील जोगेश्वरी कुंडाकडे गेले. त्या ठिकाणी मोठमोठी खोल कुंडे आहेत. त्या ठिकाणी हर्षदीपचा चुलत भाऊ पाण्यामध्ये उतरला. तो बुडू लागल्यानंतर त्यास वाचविण्यासाठी हर्षदीप पाण्यात उतरला. भावाला वाचविले; पण स्वत: हर्षदीपच बुडाला. त्यालाही पोहता येत नव्हते. सोबतच्या मित्रांनी आरडाओरडा करून त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, हर्षदीपचा बुडून अंत झाला.
घटनेची माहिती समजताच खुलताबाद पोलिस ठाण्यातील बीट जमादार राकेश आव्हाड, वेरूळ लेणी पोलिस चौकीचे हे.कॉ. प्रमोद साळवी यांनी धाव घेतली. त्यानंतर शहरातील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. सायंकाळी ६:३० वाजता अग्निशमन अधिकारी संपत भगत यांच्या मार्गदर्शनाखाली उपअग्निशमन केंद्र अधिकारी विजय राठोड, कर्मचारी संग्राम मोरे, छत्रपती केकान, शिवसंभा कल्याणकर, संदीप चव्हाण, विजय कोथमिरे, चंद्रसेन गीते यांच्या पथकाने मृतदेह बाहेर काढला. खुलताबाद ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांना देण्यात आला.
एकुलता एक कमावता मुलगा गमावलाहर्षदीपचे वडील महापालिकेत ठेकेदारी करतात. त्यांना एक मुलगा व एक मुलगी, अशी दोन अपत्ये. हर्षदीप देवगिरी महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत वडिलांच्या कामात मदत करीत होता. सर्वांसोबत चांगले संबंध असल्यामुळे मित्रांचा त्याच्यासोबत गोतावळा असायचा. हर्षदीपच्या मृत्यूमुळे मित्रपरिवारांसह नागसेननगरला धक्का बसला आहे.
जोगेश्वरी कुंड धोकादायकवेरूळ लेणी क्रमांक २९ लगत धबधबा कोसळतो, त्याच्यावर डोंगरात जोगेश्वरी लेणी व कुंड आहे. या ठिकाणी गणेश मंदिर व म्हैसमाळ येथून उगम पावणारी येळगंगा नदी खळखळून वाहते. पावसाळ्यात या ठिकाणी हौशी पर्यटक, ट्रेकर, यू ट्यूबर लोकांची मोठी गर्दी असते. या धोकादायक ठिकाणी पर्यटकांनी जाऊ नये म्हणून भारतीय पुरातत्त्व विभागाने लेणीकडून रस्ता बंद केला आहे. तरीही पर्यटक खुलताबाद- म्हैसमाळ रोडवरून या कुंडाकडे पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी जातात. या धोकादायक ठिकाणी नवख्या पर्यटकांनी जाऊ नये, असे आवाहन पुरातत्त्व खात्याचे संवर्धन साहाय्यक राजेश वाकलेकर यांनी केले आहे.