लातूर : पाचशे, हजारांच्या नोटा चलनातून रद्द होऊन आता ५० दिवस उलटले आहेत़ मात्र रिझर्व्ह बँकेकडून पुरेसा चलनपुरवठा होत नसल्याने बँका हतबल झाल्या असून, चिल्लरचेही वांदेच आहे़ परिणामी, लातूर शहरातील बाजार सावरता सावरत नसल्याचे चित्र आहे़ दरम्यान, गुरूवारी चलन तुटवड्यामुळे काही बँकांच्या एटीएममध्ये खडखडाट होता़ शिवाय, काही बँकांमध्येही पैशाचा तुटवडा असल्याचे सूत्रांनी सांगितले़ पाचशे आणि एक हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयाला पन्नास दिवस पूर्ण झाले आहेत़ चलन टंचाईबरोबरच रोकड टंचाईच्या स्थितीमध्ये फारसी सुधारणा झाली नाही़ काही बँकांच्या एटीएममधून पैसे मिळत असले तरी त्याला मर्यादा आहेत़ दोन हजार रूपयांच्या नव्या नोटेशिवाय पैसे नागरिकांना मिळत नाहीत़ त्यामुळे व्यवहारही ठप्प झाले आहेत़ जेमतेम व्यवहारापुरते हाती चलन खेळत असल्यामुळे मोठे व्यवहार करता येत नसल्याची अडचण निर्माण झाली आहे़ राष्ट्रीयकृत बँकांना पुरेसे चलन वेळेवर मिळत नसल्याने लातूर शहरातील अनेक एटीएममध्ये गुरूवारी खडखडाट होता़ त्यामुळे या एटीएमवरून त्या एटीएमवर पैशाच्या शोधात अनेकजण गुरूवारी फिरताना दिसून आले़ विशेष म्हणजे विद्यार्थी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांची चलन आणि रोकड टंचाईमुळे आर्थिक कोंडी झाली आहे़ बँक खात्यावर पैसे आहेत, मात्र मोजकेच पैसे एटीएममधून मिळत आहेत़ त्यामुळे दोन हजारांपेक्षा पुढचा व्यवहार करता येत नसल्याचे नागरिकांनी सांगितले़ पन्नास दिवसानंतरही नव्या नोटांबाबत पर्यायी व्यवस्था केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेकडून न झाल्याने अडचणींचा डोंगर दिवसेंदिवस वाढत आहे़
बाजार सावरता सावरेना!
By admin | Updated: December 29, 2016 23:02 IST