औरंगाबाद : शिक्षक, पदवीधरांचे प्रश्न सोडविण्याची धडाडी, अभ्यास, कुशलता असलेले सतीश चव्हाण हे सक्षम नेतृत्व आहे. या कार्यकुशल नेतृत्वाला पुन्हा संधी द्या, असे आवाहन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी केले. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडीचे उमेदवार आ. सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी भवनात आयोजित मेळाव्यात राजेंद्र दर्डा बोलत होते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. राजेंद्र दर्डा म्हणाले की, सतीश चव्हाण यांच्या कामाची धडाडी मी मागील पाच वर्षांपासून पाहतो आहे. आपल्या मतदारांचे प्रश्न मोठ्या तडफेने त्यांनी सभागृहात मांडले व सोडवूनही घेतले. गेल्या चार वर्षांत राज्य सरकारने शिक्षकांचे बहुतांश सर्वच प्रश्न मार्गी लावल्याचे सांगून ते म्हणाले की, शिक्षक हिताचे ५२ निर्णय शिक्षणमंत्री म्हणून मी घेतले. त्यात शिक्षणसेवकाचे पदनाम बदलणे, मानधन वाढविणे, हजारो तुकड्यांना मंजुरी, १९९६ पासून प्रलंबित राहिलेली पगारातील त्रुटी दूर केली, शाळांना वेतनेतर अनुदान दिले, कायम विनाअनुदानातील कायम शब्द काढला आदी अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांचा त्यात समावेश आहे. सभागृहात मी एकदाही अडचणीत आलो नाही, असे अभिमानाने सांगताना शिक्षणमंत्री म्हणाले की, त्याचे कारण एकच, ते केवळ शिक्षक व विद्यार्थ्यांचे प्रश्न मी मार्गी लावले. या समस्यांसाठी सतीश चव्हाण यांनीही सातत्याने आग्रह धरला. तरीही शालार्थप्रणालीद्वारे अतिरिक्त शिक्षकांचे वेतन देणे, मुख्याध्यापकांच्या वेतनश्रेणीचा व आयटी शिक्षकांचा प्रश्न अद्याप शिल्लक आहे. हे तिन्ही प्रश्न येत्या दोन महिन्यांत सोडविण्याचा माझा प्रयत्न आहे. याशिवाय औरंगाबाद- जालन्यासाठी दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर कसा खेचून आणला याची माहितीही त्यांनी दिली. सुधाकर सोनवणे म्हणाले की, काल शहरात येऊन भाजपाच्या मोहन भंडारी यांनी गरळ ओकली, त्यांना आमच्या उमेदवारांनी स्पष्ट उत्तरही दिले; परंतु त्यांना आम्ही असे विचारतो की, तुमचा उमेदवार फरार का होता, याचे उत्तर देणार का? आपल्या मतातून चांगल्या माणसांचा हुरूप वाढवा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी मंचावर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मुश्ताक अहमद, नितीन बागवे, नगरसेवक अभिजित देशमुख, उर्दू शिक्षक संघटनेचे मिर्झा सलीम, राष्ट्रवादीचे औरंगाबादपूर्वचे अध्यक्ष विश्वनाथ स्वामी, मुख्याध्यापक एस.पी. जवळकर, युवक राष्ट्रवादीचे विजय औताडे, प्रकाश मते पाटील, किरण पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. एस.पी. जवळकर यांनी प्रास्ताविक केले.
प्रश्न सोडविण्यास सतीश चव्हाण सक्षम
By admin | Updated: June 17, 2014 01:06 IST